उपनिबंधक सहकारी संस्थेच्या सहकारी अधिकार्‍याला अटक

तक्रार अर्जावर कारवाईसाठी लाचेची मागणी केल्याचे उघडकीस

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 मे 2025
मुंबई, – अंधेरीतील के पश्चिम उपनिबंधक सहकारी संस्थेच्या एका सहकारी अधिकार्‍याला त्याच्याच कार्यालयात लाच घेताना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. विकास रामचंद्र कोरडे असे या अधिकार्‍याचे नाव असून तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी त्यांनी चार लाखांची मागणी केली होती. त्यापैकी दोन लाख रुपयांचा लाचेचा पहिला हप्ता घेताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यांत इतर काही अधिकार्‍यांचे नावे समोर आले असून त्यांची लवकरच संबंधित अधिकार्‍याकडून चौकशी होणार आहे.

यातील तक्रारदार पश्चिम उपनगरात राहत असून ते त्यांच्या सोसायटीचे खजिनदार म्हणून काम पाहत होते. सोसायटीचे सचिवासह इतर सभासद बेकायदेशीर काम करत असल्याने त्यांनी संबंधित पदाधिकार्‍याकडे जाब विचारला होता. त्यातून त्यांच्यात वाद झाला आणि सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी एकमताने त्यांना खजिनदार पदावरुन काढून टाकले होते. त्यामुळे अंधेरीतील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात सोसायटीच्या पदाधिकार्‍यांविरोधात एक तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जात त्याीं नवीन सभासदांची नेमणूक करणे, त्यांच्या सोसायटीचे कमिटी सभासद बेकायदेशीर काम करत असून सोसायटीच्या कायद्याप्रमाणे काम करत नसल्याचे आरोप करुन ही कमिटीच रद्द करण्याची मागणी केली होती.

या अर्जाची संबंधित कार्यालयाने गंभीर दखल घेत सोसायटीला तक्रारदारांना पुन्हा खजिनदारपदी नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशानंतर सोसायटीचे सचिव आणि इतर पदाधिकार्‍यांनी त्यांची नियुक्ती केली नव्हती. त्यामुळे तक्रारदारांनी पुन्हा अंधेरीतील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात तक्रार केली होती. याच संदर्भात त्याीं सुनिल कोठावळे आणि विकास कोरडे यांची भेट घेतली होती. यावेळी विकास कोरडे यांनी त्यांच्या तक्रार अर्जाची दखल घेऊन कारवाई करण्यासाठी चार लाखांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने 24 एप्रिल 2025 रोजी त्यांनी विकास कोरडे यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

28 एप्रिलला या तक्रारीची संबंधित अधिकार्‍याकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी विकास कोरडे यांनी त्यांच्या अर्जावर कारवाई करण्यासाठी चार लाखांची मागणी करुन दोन लाखांचा पहिला हप्ता घेऊन येण्यास सांगितले होते. ठरल्याप्रमाणे मंगळवारी तक्रारदार संबंधित कार्यालयात दोन लाखांचा पहिला हप्ता घेऊन गेले होते. यावेळी लाचेची ही रक्कम घेताना विकास कोरडे यांना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. दोन लाखांच्या लाचप्रकरणी विकास यांच्या अटकेचे वृत्त समजताच तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page