बाईक चालविताना हेल्मेट घातले नाही म्हणून लाचेची मागणी

तीन हजाराची लाच वाहतूक पोलीस शिपायाला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 जून 2025
मुंबई, – बाईक चालविताना हेल्मेट घातले नाही म्हणून साडेदहा हजाराची रक्कम भरण्यास सांगून दंडाची रक्कम भरायची नसेल तर पाच हजाराची लाचेची मागणी करुन तीन हजार रुपयांची लाच घेताना वाहतूक पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विनायक बापू राठोड असे या पोलीस शिपायाचे नाव असून तो सध्या दादर पोलीस चौकीत कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तीन हजाराची लाच घेणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे.

यातील तक्रारदार 32 वर्षांचे आहे. काही दिवसांपूर्वी ते दादर येथून त्यांच्या बाईकवरुन जात होते. यावेळी त्यांनी बाईक चालविताना हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे त्यांना विनायक राठोड याने अडविले. बाईक चालविताना हेल्मेट घातले नाही म्हणून त्यांना साडेदहा हजाराचा दंड भरण्यास सांगितला. यावेळी त्यांनी दंड न भरता काही रक्कम घेऊन सोडून देण्याची विनंती केली होती. यावेळी त्यांनी दंड भरायचा नसेल तर त्यांना पाच हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. मात्र पाच हजाराची रक्कम जास्त असल्याने त्याने त्यांना तीन हजाराची लाच देण्याची तयारी दर्शविली होती.

ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी विनायक राठोड यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ठरल्याप्रमाणे तक्रारदार विनायक राठोडला तीन हजाराची लाच देण्यासाठी गेले होते. यावेळी लाचेची ही रक्कम घेताना विनायक राठोडला या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात पुढील चौकशीसाठी आणण्यात आले होते. विनायक हे दादर येथील वाहतूक पोलीस चौकीत पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना लाचप्रकरणी अटक झाल्याचे समजताच त्यांच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page