मनपा कर्मचार्‍यासह लेखापरिक्षकाला लाचप्रकरणी अटक

एकाच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 जुलै 2025
मुंबई, – अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी तसेच सोसायटीच्या शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी लाचेची मागणी करुन लाचेचा पहिला घेताना मनपा अधिकार्‍यासह एका लेखापरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. हरिकृष्णा आदिमुलम आणि दयानंद धनाजी चव्हाण अशी या दोघांची नावे आहेत. यातील हरिकृष्णा हा गोवंडीतील एम-पूर्व महानगरपालिकेचा कामगार तर दयानंद चव्हाण हा सहकार विभागाचा लेखापरिक्षक आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवाई एकच खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी गोवंडी येथील गौतमनगर परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुर केले होते. इमारतीचे बांधकाम चौदा फुटाच्या वर गेले होते. त्यामुळे महानगरपालिकेने संबंधित बांधकाम तोडण्याची नोटीस बजाविली होती. या नोटीसनंतर ते गोवंडीतील एम-पूर्व विभागात गेले होते. तिथेच त्यांनी कनिष्ठ अभियंता राहुल कांबळे व कामगार हरिकृष्णा आदिमुलम यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी इमारतीवर कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच दिली नाहीतर अनधिकृत बांधकाम तोडण्याची धमकी देण्यात आली होती.

लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शवून त्यांनी बुधवार 16 जुलैला या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याची संबंधित अधिकार्‍याकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात या दोघांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी पन्नास हजाराची लाचेची मागणी करुन वीस हजार रुपये लाच घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर या अधिकार्‍यांनी संबंधित कार्यालयात सापळा लावून कामगार हरिकृष्णा आदिलमुलम याला वीस हजाराची लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईदरम्यान कनिष्ठ अभियंता राहुल कांबळे हे पळून गेल्याने त्यांना या गुन्हयांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले.

दुसर्‍या कारवाईत सहकार विभाग पॅनेलचे अधिकृत प्रतिनिधी आणि प्रमाणित लेखापरिक्षक दयानंद धनाजी चव्हाण यांना पन्नास हजाराची लाच घेताना या अधिकार्‍यांनी अटक केली. यातील तक्रारदारांनी एका सोसायटीमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. या सोसायटीची कार्यकारी कमिटी बरखास्त करण्यात आली होती. त्यामुळे सोसायटीवर सहकार विभागाने दयानंद चव्हाण यांची अधिकृत अधिकारी आणि प्रमाणित लेखापरिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे त्यांनी सोसायटीचे शेअर सर्टिफिकेट मिळण्यासाठी त्यांच्याकडे रितसर अर्ज केला होता. मात्र शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी दयानंद चव्हाण यांनी त्यांच्याकडे एक लाख दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

ही लाच देणयाची इच्छा नसल्याने 10 जुलैला त्यांनी दयानंद चव्हाण यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या अधिकार्‍यांनी तिथे सापळा लावला होता. यावेळी दयानंद चव्हाण याला लाचेचा पन्नास हजाराचा हप्ता घेताना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत माळी, पोलीस निरीक्षक निलेश पाटील, कृष्णा मेखले आणि गणपत परचाके यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page