हॉटेल व्यावसायिकाकडून लाच घेताना स्वच्छता निरीक्षकाला अटक
साहित्य सोडवून हॉटेल सुरु करण्यासाठी लाचेची मागणी केली होती
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 जुलै 2025
मुंबई, – हॉटेल व्यावसायिकाकडून चाळीस हजार रुपयांची लाचेची मागणी करुन तीस हजार रुपयांचा हप्ता घेताना गणेश संभाजी कदम या महानगरपालिकेच्या अधिकार्याला बुधवारी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. गणेश हे महानगरपालिकेच्या आर-दक्षिण विभागात स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांच्या मित्रांचा एक हॉटेल असून त्यातील किचन रेस्ट्रॉरंट हे त्यांनी त्यांच्या मित्रांकडून एक वर्षांपासून चालविण्यासाठी घेतला होता. त्यामुळे त्यांनी आर-दक्षिण मनपा कार्यालयात हेल्थ लायसन्स आणि इटिंग हाऊस लायसन्ससाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्याकडे दोन्ही लायसन्स नसल्याने गणेश कदम यांनी त्यांच्या किचन रेस्ट्रॉरंटमध्ये कारवाई केली होती. रेस्ट्रॉरंटमधील सर्व साहित्य जप्त करुन ते रेस्ट्रारंट बंद करण्याचे आदेश दिले होते.
28 जूनला ते साहित्य सोडविण्याासठी तक्रारदार व्यावसायिक संबंधित कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी संभाजी कदम यांची भेट घेऊन त्यांच्याकडे साहित्य सोडविण्यासाठी मदत करण्याची विनंती केली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे रेस्ट्रॉरंट चालू ठेवण्यासाठी पुढील तीन महिने चाळीस हजार रुपयांची लाचेची ामगणी केली होती. ही लाच दिली नाहीतर त्यांना रेस्ट्रॉरंट चालू करता येणार नाही असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांना चाळीस हजार रुपयांची लाचेची देण्याची तयारी दर्शवून 1 जुलैला त्यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर नऊ दिवसांनी त्त्याची शहानिशा करण्यात आली होती. त्यात संभाजी कदम यांनी तक्रारदाराांच्या कामासाठी चाळीस हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. तडजोडीनंतर त्याने तीस हजाराचा हप्ता घेऊन त्यांच्या कार्यालयात येण्यास सांगितले होते. त्यामुळे तक्रारदार व्यावसायिक लाचेचा तीस हजाराचा हप्ता घेऊन त्यांच्या कार्यालयात गेले होते.
यावेळी लाचेची ही रक्कम घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम कायदा 7 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्यांना गुरुवारी दिवशी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.