25 हजाराची लाचेची रक्कम घेऊन पोलीस हवालदाराचे पलायन
लाचेच्या गुन्ह्यांत महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 ऑगस्ट 2025
मुंबई, – गुन्ह्यांत मदत करण्यासाठी तसेच इतर गुन्ह्यांत न अडकाविण्यासाठी एक लाखांची लाचेची मागणी करुन पंधरा हजाराची लाचेची रक्कम घेतल्यानंतर 25 हजाराचा दुसरा हप्ता घेऊन पोलीस हवालद जयप्रकाश माळी याने पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लाचप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री सुभाष लोंढे हिला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या गुन्ह्यांत पोलीस हवालदार जयप्रकाश माळी याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या कारवाईची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार कुर्ला येथील रहिवाशी असून मजुरीचे काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्यासह त्यांच्या मित्रांविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांत एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री लोंढे यांच्याकडे होता. गुन्हा दाखल होताच जयश्री लोंढे हिने तक्रारदारासह त्यांच्या मित्रांना चौकशीसाठी बोलाविले होते. त्यामुळे ते पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी जयश्री लोंढे हिने त्यांचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यांना या गुन्ह्यांत मदत करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच त्यांचा दुसर्या गुन्ह्यांत सहभाग न दाखविण्यासाठी तसेच त्यांना या गुन्ह्यांत न अडकाविण्यासाठी एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. मजुरीच्या कामातून त्यांना इतके पैसे मिळत नसल्याने त्यांनी जयश्री लोंढे हिला एक लाख रुपये देणे शक्य नसल्याचे सांगितले.
तसेच लाचेची रक्कम कमी करण्याची विनंती केली होती. यावेळी तिने त्यांच्याकडे 50 हजाराची मागणी करुन आणखीन रक्कम कमी होणार नाही. ही लाच दिली नाहीतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करुन त्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली होती. अटकेच्या भीतीने तक्रारदाराच्या नातेवाईकांनी तिला 15 हजार रुपये दिले होते. ही लाच दिल्यानतर तक्रारदारासह त्याच्या मित्राला सोडून देण्यात आले. त्यानंतर त्यांना उर्वरित 35 हजार रुपये दिल्यानंतर त्यांचे मोबाईल परत करण्याचे तिने आश्वासन दिले होते. 4 ऑगस्टला तिने तक्रारदाराच्या नातेवाईकांना कॉल करुन मोबाईल परत करण्यासाठी तसेच गुन्ह्यांत मदत करण्यासाठी उर्वरित 35 हजाराची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मंगळवार 5 ऑगस्टला जयश्री लोंढे हिच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा करताना जयश्री लोंढे हिने 35 हजाराची मागणी करुन तडतोडीनंतर 25 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले होते. तसेच ही रक्कम तिने पोलीस हवालदार जयप्रकाश माळी याला देण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे तक्रारदार 25 हजार रुपये घेऊन तिथे गेले होते. यावेळी पोलीस हवालदार जयप्रकाश माळीने त्यांना त्याच्या गाडीत बसविले. गाडीतच त्याने त्यांच्याकडून 25 हजार रुपये घेतले होते. ही लाच घेतल्यानंतर त्यांना संशय आल्याने ते लाचेच्या रक्कमेसह गाडीतून पळून गेले होते. या घटनेनंतर या पथकाने पोलीस उपनिरीक्षक जयश्री लोंढे यांना लाचेच्या गुन्ह्यांत अटक केली.
जयप्रकाश माळी हे लाचेच्या रक्कमेसह पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. लाचेच्या गुन्ह्यांत महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री लोंढे हिला झालेली अटक आणि पोलीस हवालदार जयप्रकाश माळी हे लाचेची रक्कम पळून गेल्याचे समजताच विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत माळी, पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर यांनी केली.