मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 सप्टेंबर 2025
मुंबई, – तांदूळ उतरविताना ट्रकचा जीपीएस क्रमांक बंद होता, निरीक्षक हजर नसल्याचा आरोप करुन एका शिधावाटप दुकानातील मॅनेजरला कारवाई धमकी देऊन कारवाई टाळण्यासासाठी वीस हजाराची लाचेची मागणी करुन लाचेची ही रक्कम घेताना शिधावाटप अधिकारी सचिन बळीराम आन्नाम याला सोमवारी त्यांच्याच कार्यालयात मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. कारवाईची धमकी देऊन या लाचेची मागणी करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी करणे सचिन आन्नाम यांना चांगलेच महागात पडले आहे. अटकेनंतर त्यांना विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
यातील 25 वर्षांचे तक्रारदार कांदिवलीतील एका शिधावाटप दुकानात मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या दुकानात शिधावाटपाचे तांदूळ आले होते. ते तांदूळ ट्रकमधून उतरविताना तिथे सचिन आन्नाम हे त्यांच्या सहकार्यांसोबत आले होते. यावेळी त्यांनी ट्रकचा जीपीएस का बंद ठेवला आहे. शिधावाटप निरीक्षक हजर नसताना सामान का उतरविण्यात आले याचा चालकाला जाब विचारला होता. त्यानंतर त्यांनी तक्रारदारासह ट्रकचालकाची जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्याविरुद्ध तक्रार करुन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.
गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याने त्यांच्याकडे वीस हजाराची लाचेची मागणी केल होती. ही लाच दिली नाहीतर त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी दिली होती. या कारवाईला घाबरुन त्यांनी त्याला वीस हजार रुपयांची लाच देण्याची तयारी दर्शवून 25 ऑगस्टला त्याच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर दुसर्या दिवशी संबंधित अधिकार्यांनी शहानिशा केली होती. त्यात सचिन आन्नाम यांनी तक्रारदाराकडून वीस हजाराची मागणी करुन ती लाच घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर सोमवारी सचिन आन्नाम याला त्याच्याच कार्यालयात तक्रारदाराकडून वीस हजाराची लाचेची रक्कम घेताना या अधिकार्यांनी रंगेहाथ अटक केली. या कारवाईने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.