मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – मनपाच्या एल वॉर्डच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ पर्यवेक्षक सुरेश मारुती सुरकुले याच्यावर लाचप्रकरणी कारवाई झाल्याची घटना ताजी असताना अशाच दुसर्या घटनेत महानगरपालिकेच्या दोन अधिकार्यांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. प्रशांत प्रकाश कासारे आणि संतोष गोविंद मोहकर अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मनपाच्या पी उत्तर विभागात अनुक्रमे कनिष्ठ पर्यवेक्षक आणि पर्यवेक्षक म्हणून कामाला आहेत. शुक्रवारी झालेल्या कारवाईमुळे मनपा अधिकारी आणि कर्मचारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार पी उत्तर विभाग, मनपाचे सफाई कर्मचारी आहेत. 12 सप्टेंबरला मुकादमांनी त्यांच्या कामाची पाहणी केली होती. त्यात तक्रारदाराने एका जागेचा कचरा उचलला नव्हता. हा कचरा न उचलता ते निघून गेले होते. त्यामुळे मुकादमांनी त्यांच्या कामाबाबत रजिस्टरमध्ये नोंद केली होती. दुपारी तक्रारदार हजेरी नोंदणीसाठी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी मुकादमास कनिष्ठ पर्यवेक्षक प्रशांत कासारे यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. दुसर्या दिवशी म्हणजेच शनिवारी 13 सप्टेंबरला तक्रारदार पुन्हा हजेरी नोंदणीसाठी आले होते. यावेळी मुकादम आणि कनिष्ठ पर्यवेक्षक प्रशांत कासारे यांनी त्यांची नोंदणी घेण्यास मनाई केली होती. त्यांना पर्यवेक्षक संतोष होहकर आणि मुख्य पर्यवेक्षक नेरुळकर यांना भेटण्यास सांगून ही भेट झाल्यानंतर कामावर येण्यास सांगितले होते.
सोमवारी ते संतोष मोहकर यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी तक्रारदाराकडून माफीनामा लिहून घेतला. तसेच संबंधित प्रकरण मिटविण्यासाठी त्यांच्याकडे दहा ते पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. 16 सप्टेंबरला ही तक्रार प्राप्त होताच दुसर्या दिवशी 17 सप्टेंबरला त्याची शहानिशा करण्यात आली होती. यावेळी तक्रारदाराकडून प्रकरण मिटविण्यासाठी आरोपी पर्यवेक्षकांनी दहा हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले होते.
याबाबत त्यांना प्रशांत कासारे यांच्याशी बोलून घेण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे ते त्यांच्याशी संपर्कात होते. यावेळी प्रशांत कासारे यांनी साडेसात हजार रुपये संतोष मोहकर यांना देण्यास सांगितले होते. त्यानंतर या पथकाने तिथे सापळा लावून साडेसात हजाराची लाचेची रक्कम घेताना पर्यवेक्षक प्रशांत कासारे याला रंगेहाथ पकडण्यात आले. याच गुन्ह्यांत प्रशांत कासारे याचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याला नंतर या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. ही कारवाई पोलीस निरीक्षक माधुरी माने, निलेश पाटील यांनी केली.