वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकाला लाचप्रकरणी अटक

गुन्ह्यांत अटक न करता मदत करण्यासाठी लाचेची मागणी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 सप्टेंबर 2025
मुंबई, – वडाळा टी टी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस उपनिरीक्षकाला शुक्रवारी सायंकाळी दोन लाख तीस हजार रुपयांच्या लाचप्रकरणी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुधाकर सरोदे आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल रमेश वाघमोडे अशी या दोघांची नावे आहेत. गुन्हा दाखल असलेल्या आरोपीच्या मुलीला गुन्ह्यांत अटक न करता मदत करण्यासाठी तसेच विरोधकाविरुद्ध कारवाई करण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या कारवाईने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

यातील 59 वर्षांचे तक्रारदार वडाळा परिसरात राहत असून गेल्या काही दिवसांपासून त्यांचे एका व्यक्तीसोबत त्यांच्या समाजाच्या हॉलवरुन वाद सुरु होता. 7 सप्टेंबरला याच वादातून त्यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे दोन्ही लोकांनी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रार केली होती. यावेळी विरुद्ध गटाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच त्यांनी तक्रारदारांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलाविले होते. त्यामुळे ते पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी राहुल वाघमोडे यांची भेट घेतली होती.

यावेळी त्याने त्यांना या गुन्ह्यांत तक्रारदाराच्या मुलीला आरोपी न करता तिला गुन्ह्यांत मदत करण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या विरुद्ध पार्टीविरुद्ध कारवाई करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. त्यासाठी त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांना पाच लाख तर स्वतसाठी पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र पाच लाख रुपये जास्त असल्याने त्यांनी चंद्रकांत सरोदे यांना चार लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. यावेळी राहुल वाघमोडे याने त्यांच्याकडून लाचेचा पहिला वीस हजार रुपयांचा हप्ता घेतला होता. त्यानंतर ते त्यांना लाचेच्या रक्कमेसाठी सतत कॉल करत होते.

ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रकांत सरोदे आणि राहुल वाघमोडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. 17 सप्टेंबरला आलेल्या तक्रारीनंतर त्याची संबंधित विभागाकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात राहुल वाघमोरे यांनी त्यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्यासाठी चार लाखांची तर स्वतसाठी उर्वरित तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. शुक्रवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वडाळा टी टी पोलीस ठाण्यात सापळा लावून दोन लाख तीस हजार रुपयांची लाच घेताना चंद्रकांत सरोदे आणि राहुल वाघमोडे यांना पोलीस ठाण्यात रंगेहाथ पकडले होते.

या कारवाईनंतर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आणले होते. या कारवाईनंतर या दोन्ही पोलीस अधिकार्‍यांच्या घरासह इतर ठिकाणी एकाच वेळेस कारवाई करण्यात आली होती. या कारवाईचा तपशील मात्र समजू शकले नाही. पोलीस ठाण्यातच वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस उपनिरीक्षकाला लाचप्रकरणी अटक झाल्याने तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page