धोबीतलावच्या लघुवाद कोर्टाच्या अनुवादक दुभाषिकाला अटक
बाजूने निकाल लावण्यासाठी २५ लाख घेताना एसीबीची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० सप्टेंबर २०२४
मुंबई, – धोबीतलाव येथील लघुवाद कोर्टाचे अनुवादक दुभाषिक विशाल चंद्रकांत सावंत याला २५ लाख रुपयांची लाच घेताना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या दाव्यावर त्यांच्या बाजूने निकाल लावण्यासाठी लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने लघुवाद कोर्टातील न्यायालयीन कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
६६ वर्षांच्या तक्रारदार हॉटेल व्यावसायिक असून त्यांच्या हॉटेलच्या मालकी हक्कावरुन वाद सुरु होता. हा वाद मिटण्याची शक्यता नसल्याने त्यांनी हॉटेलच्या मालकीबाबत धोबीतलाव येथील लघुवाद कोर्टात एक याचिका दाखल केली ोती. या याचिकेचा निकाल अंतिम टप्यात आहेत. याच दम्यान कोर्टावे अनुवादक दुभाषिक विशाल सावंत याने त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या बाजूने निकाल लावून देतो असे सांगून त्यांच्याकडे २५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रकांत सावंत यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची लाचलुपचत प्रतिबंधक विभागाकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात विशालने तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या अधिकार्यांनी सापळा लावला होता.
सोमवारी ९ सप्टेंबरला तक्रारदारांनी विशाल सावंतला लाचेची रक्कम घेण्यासाठी काळबादेवी येथील अशोक शॉपिंग सेंटरच्या कामत हॉटेलमध्ये बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे सोमवारी तो तिथे गेला होता. यावेळी तक्रारदाराकडून २५ लाखांची लाचेची रक्कम घेताना विशालला या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत मंगळवारी दुपारी त्यांना विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. २५ लाख रुपयांची लाच घेताना विशाल सावंतच्या अटकेचे वृत्त लघुवाद कोर्टासह इतर कोर्टातील न्यायालयीन कर्मचार्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.