पंधरा हजाराच्या लाचप्रकरणी दोन पोलिसांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस शिपायासह दोघांना अटक तर पळालेल्या शिपायाचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 जानेवारी 2026
मुंबई, – विदेशातून आयात केलेल्या सिगारेट विक्रेत्यावर कारवाईची धमकी देऊन कारवाई न करण्यासाठी तीस हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी दोन पोलीस शिपायासह एका खाजगी व्यक्ती अशा तिघांविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यापैकी पोलीस शिपाई राजेंद्र शिवाजी व्यवहारे आणि खाजगी व्यक्ती राजसिंग शिवकुमार सिंग या दोघांना पंधरा हजार रुपयांच्या लाचप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर पोलीस शिपाई राजेंद्र सर्जेराव आंबीलवाड हा पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. राजेंद्र व्यवहारे आणि राजेंद्र आंबीलवाड हे व्ही. पी रोड पोलीस ठाण्यात कार्यरत असून या कारवाईने पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार सिगारेट विक्रेता असून विदेशात आणलेल्या सिगारेटची गिरगाव परिसरातील दुकानदारांना विक्री करतात. ही माहिती अलीकडेच व्ही. पी रोड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राजेंद्र व्यवहारे आणि राजेंद्र आंबीलवाड यांना समजली होती. 16 जानेवारीला त्यांनी तक्रारदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्यावर विनापरवाना विदेशी सिगारेट विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर अटकेची कारवाईची धमकी दिली होती. ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून गुडलक म्हणून चाळीस हजार तर दरमाह प्रत्येकी पाच हजाराप्रमाणे दहा हजाराची मागणी केली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना गुडलक म्हणून वीस हजार रुपये आणि दरमहा दहा हजार रुपयांची लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शविली होती.
ही रक्कम दिली नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई होण्याची शक्यता होती. त्यातच त्यांना लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी दोन्ही पोलीस शिपायाविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या अधिकार्यांनी 19 जानेवारी, 20 जानेवारी आणि 21 जानेवारीला शहानिशा केली होती. त्यात राजेंद्र व्यवहारे आणि राजेंद्र आंबीलवाड यांनी त्यांच्याकडे गुडलक म्हणून 20 हजार आणि दरमहा 10 हजार रुपये घेण्याचे मान्य केले होते. यावेळी राजेंद्र आंबीलवाड यांनी लाचेची रक्कम खाजगी व्यक्ती शिवकुमार सिंग याच्याकडे देण्यास सांगितले होते.
ही बाब उघडकीस येताच या अधिकार्यांनी गुरुवारी गिरगाव परिसरात सापळा लावला होता. यावेळी राजसिंग याला पंधरा हजाराची लाचेची रक्कम घेताना या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. चौकशीत त्याने लाचेची रक्कम राजेंद्र व्यवहारे आणि राजेंद्र आंबीलवाड यांच्या सांगण्यावरुन घेतल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर राजेंद्र व्यवहारे यांना पोलिसांनी अटक केली तर राजेंद्र आंबीलवाड हा कारवाईनंतर पळून गेला होता. त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
या तिघांविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम 7, 7 (अ), 12 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल हारुगडे, पोलीस निरीक्षक नितीन थोरात यांनी केली.