मनपाच्या दोन लाचखोर अधिकार्‍यासह पोलीस हवालदाराला अटक

मुंबईसह नाशिक शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 फेब्रुवारी 2026
मुंबई, – दोन वेगवेगळ्या कारवाईत मुंबई महानगरपालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या दोन लाचखोर पालिका अधिकार्‍यांसह पंचवटी पोलीस ठाण्याच्या एका पोलीस हवालदाराला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटक आरोपींमध्ये अनुज्ञापन निरीक्षक कविता निलेश धनावडे, वरिष्ठ अनुज्ञापन निरीक्षक सय्यद सरफुद्दीन इमाम आणि पोलीस हवालदार संदीप दगू गांगुर्डे यांचा समावेश आहे. अटकेनंतर या तिघांनाही विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई मुंबईसह नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार व्यावसायिक आहे. त्यांच्या मालकीचे एक कॅफे शॉप आहे. या शॉपच्या ग्लो शाईन बोर्ड अनधिकृत होता. त्यामुळे या बोर्डवर जी-नॉर्थ मनपा अधिकार्‍यांनी कारवाई केली होती. या कारवाईनंतर शॉपच्या मालकांना 1 लाख 19 हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम भरण्यासाठी तसेच त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी पालिका अधिकारी कविता धनावडे आणि सय्यद इमाम यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी त्यांच्याकडे 40 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची तयारी दर्शवून 2 फेब्रुवारीला त्यांनी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर 2 फेब्रुवारी आणि 3 फेब्रुवारीला त्याची शहानिशा करण्यात आली होती. यावेळी संबंधित पालिका अधिकार्‍यांनी तक्रारदारावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 40 हजाराच्या लाचेची मागणी करुन 35 हजार घेण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्यापमाणे मंगळवारी 3 फेब्रुवारीला या अधिकार्‍यांनी तिथे सापळा लावून 35 हजाराची लाचेची रक्कम कविता धनावडे हिला अटक केली. लाच घेतल्यानंतर ती तिचे वरिष्ठ निरीक्षक सय्यद इमाम यांना फोनवरुन माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनाही या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली.

ही कारवाई ताजी असताना बुधवारी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पोलीस हवालदार संदीप गांगुर्डे यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. यातील तक्रारदाराविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांत समझोता करुन मदत करण्यासाठी पोलीस हवालदार संदीप गांगुर्डे यांनी तक्रारदाराकडे दहा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांनी त्याच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संदीप गांगुर्डे यांना पाच हजाराची लाच घेताना या अधिकार्‍यांनी अटक केली. या कारवाईबाबत संशय आल्याने संदीपने पोलीस ठाण्याच्या बाथरुममधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना या अधिकार्‍यांनी पाठलाग करुन शिताफीने अटक केली. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद सावंत, पोलीस निरीक्षक माधुरी माने, निलेश पाटील, सागर आरगडे व अन्य पोलीस पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page