काशिगाव पोलीस ठाण्याच्या शिपायाला लाचप्रकरणी अटक
तीन हजारानंतर सात हजाराची लाच घेण्याचा प्रयत्न केला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – कायदेशीर कारवाई न करण्यासाठी तसेच जप्त केलेला लायसन्स परत करण्यासाठी दहा हजाराची लाचेची मागणी करुन तीन हजाराची लाच घेतल्यानंतर सात हजाराचा दुसरा हप्त घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंगेश नामदेव रक्षे या ४२ वर्षांच्या पोलीस शिपायाला मुंबई युनिटच्या लाचलुचत प्रतिबंधक विभागाने अटक केली. मंगेश रक्षे हा काशिगाव पोलीस ठाण्याचा शिपाई असून त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारे अनेक लाचेची मागणी केल्यचे गंभीर आरोप असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने बोलताना सांगितले. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले. लाचप्रकरणी अटकेची कारवाई झाल्याने त्याच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई होणार आहे.
यातील तक्रारदार चालक म्हणून काम करतात. ११ सप्टेंबरला ते कामानिमित्त कल्याण येथे त्यांच्या कारने गेले होते. काम संपल्यानंतर ते कल्याणहून काशिमिरामार्गे येत होते. यावेळी रस्त्यात त्यांची कार बंद पडली होती. त्यामुळे त्यांनी पार्किंग लाईट लावून त्यांची कार रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. याच दरम्यान बाईकवरुन जाणार्या मंगेश रक्षे याने त्यांच्या कारला मागून धडक दिली होती. त्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. अपघातानंतर त्याने त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी शंभर क्रमांकावर संपर्क साधून ही माहिती सांगितली होती. त्यानंतर काशिगाव पोलीस ठाण्याचे पथक तिथे आले होते. अपघातात जखमी झालेल्या मंगेश रक्षे यांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले होते. त्यानंतर ते पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी तक्रारदाराचा लायसन्स ताब्यात घेतला होता. त्यांच्यावर कारवाईची धमकी दिली होती. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन या गुन्ह्यांत अटक करणार असल्याचे सांगून ही कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडे त्याने दहा हजाराची लाचेची मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडे दहा हजार रुपये नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्यातील तीन हजार रुपये एका पानटपरीच्या मोबाईलवर जीपेद्वारे ट्रान्स्फर करण्यास त्यांना भाग पाडले. तसेच लायसन्स परत करण्यासाठी मंगेश रक्षे त्यांच्याकडे सात हजाराची मागणी करत होता. ही लाच दिल्याशिवाय तो लायसन्स देणार नाही याची खात्री होताच त्यांनी लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शवून मंगेश रक्षेविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केलीहोती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरुन तक्रारदारांनी मंगेश रक्षेला गुरुवारी लाचेची ही रक्कम घेण्यासाठी बोलाविले होते. यावेळी या अधिकार्यांनी तिथे साध्या वेशात सापळा लावला होता. ठरल्याप्रमाणे मंगेश रक्षे तिथे आला होता. त्याने तक्रारदाराच्या खिशाची तपासणी केली असता त्याच्या हाताला लाचेची रक्कम आणि व्हाईस रेकॉर्ड लागले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सापळा लावलेल्या या पथकाने मंगेश रक्षेला शिताफीने अटक केली. तीन हजाराची लाच घेतल्यानंतर दुसरा सात हजाराचा हप्ता घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला शुक्रवारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. मंगेश रक्षेच्या अटकेने काशिगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.