साडेतीन लाखांची लाच घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक

फसवणुकीच्या गुन्ह्यांत मदतीसह अटक न करण्यासाठी लाचेची मागणी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – साडेतीन लाख रुपयांची लाचेची रक्कम घेताना नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश संभाजी कदम यांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. फसवणुकीच्या गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका व्यावसायिकाला मदतीसह अटक न करण्यासाठी सतीश कदम यांनी पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. या लाचेचा हप्ता घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर लाचप्रकरणी कारवाई करण्यात आल्याने नवी मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. यापूर्वी याच तक्रारदााराकडून अन्य एका गुन्ह्यांत सतीश गायकवाड यांनी बारा लाखांची लाचेची मागणी करुन दोन लाख रुपयांची लाच घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

यातील तक्रारदार नवी मुंबईतील रहिवाशी आहेत. त्यांच्या वडिलांविरुद्घ एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात एका इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत तळोजा कारागृहात आहेत. या गुन्ह्यांत त्यांच्या वडिलांना जामिन मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी त्यांनी एनआरआय सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान सतीश कदम यांनी तक्रादाराला त्यांच्या वडिलांना मदत करणे तसेच जामिन मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले होते. याकामी त्यांनी त्यांच्याकडे बारा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी दोन लाख रुपये त्यांच्याकडून घेतले होते. २ ऑक्टोंबर २०२४ रोजी त्यांच्या वडिलांविरुद्ध एनआरआय सागरी पोलिसांनी अन्य एका फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांत त्यांचा घेऊन अटक न करण्यासाठी त्यांना गुन्ह्यांत मदत करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र ही लाच जास्त असल्याने त्यांनी त्यांना चार लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर त्यांनी सतीश कदम यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर मंगळवारी ८ ऑक्टोंबरला तक्रारीची मुंबई युनिटकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यानंतर या अधिकार्‍यांनी एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून साडेतीन लाखांची लाखांची रक्कम घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचेच्या गुन्ह्यांत वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक झाल्याचे समजताच एनाआरआय सागरी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. या कारवाईनंतर सतीश कदम यांच्या कार्यालयासह घर आणि इतर ठिकाणी या पथकाने छापे टाकले होते, या कारवाईत सतीश कदम यांनी लाखो रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या मालकीचे काही फ्लॅट, वाहनाचे कागदपत्रांसह सोन्याचे दागिने आणि सुमारे ४८ लाखांची कॅश या अधिकार्‍यांनी जप्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page