गुन्ह्यांत मदतीसाठी 20 हजाराची लाच घेणार्या दोन पोलिसांना अटक
सहाय्यक फौजदारासह शिपायाचा समावेश; दोघांना पोलीस कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 मार्च 2025
मुंबई, – गुन्ह्यांत मदतीसह कारवाईदरम्यान जप्त केलेली कार सोडविण्यासाठी 35 हजाराची लाचेची मागणी करुन वीस हजार रुपयांचा लाचेचा हप्ता घेताना दोन पोलिसांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यात सहाय्यक फौजदार सुनिल महादेव देसाई आणि पोलीस शिपाई विक्रम अतुल शेंडगे यांचा समावेश आहे. ते दोघेही एमएचबी पोलीस ठाण्याशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार 38 वर्षांचे असून गेल्या आठवड्यात त्यांच्याविरुद्ध एमएचबी पोलीस ठाण्यात अपघाताचा एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांत त्यांच्या मालकीची कार पोलिसांनी ताब्यात घेतली होती. याच गुन्ह्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते एमएचबी पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी सहाय्यक फौजदार सुनिल देसाई यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांना गुन्ह्यांत त्यांना मदत करण्यासाठी तसेच त्यांची चारचाकी कार सोडविण्यासाठी लाचेची मागणी केली होती. 35 हजाराची लाच दिल्यास त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र लाचेची ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना वीस हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर मंगळवारी 18 मार्चला त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सुनिल देसाई यांच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुनिल देसाई यांनी लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम पोलीस शिपाई विक्रम शेंडगे यांच्याकडे देण्यास सांगितले होते. त्यानंतर या पथकाने तिथे सापळा लावला होता.
ठरल्याप्रमाणे पोलीस शिपाई विक्रम शेंडगे यांनी तक्रारदाराकडून वीस हजार रुपयांची लाच घेतली होती. यावेळी त्यांना लाचेच्या रक्कमेसह पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही लाच त्यांनी सुनिल देसाई याच्या सांगण्यावरुन घेतली होती, त्यामुळे या गुन्ह्यांत त्यांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बुधवारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त शिरीष माणगावे, पोलीस निरीक्षक निता भोसले यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी सांगितले.