भिवंडी-निजामपुर मनपाच्या सहाय्यक आयुक्तासह दोघांना अटक
बांधकामावर कारवाई न करण्यासाठी दिड लाखांची लाचेची मागणी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० जानेवारी २०२५
मुंबई, – अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी दिड लाखांच्या लाचेची मागणी करुन लाचेचा पन्नास हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्तासह दोघांना शनिवारी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. सहाय्यक आयुक्त सुनिल भास्कर भोईर आणि बीट निरीक्षक अमोल रामचंद्र वारघडे अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकाच वेळेस सहाय्यक आयुक्त आणि बीट निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांना लाचप्रकरणी अटक झाल्याने भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार भिवंडी-निजापूर महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी आहेत. त्यांनी त्यांच्या घराचे चार मजली बांधकाम केले होते. या बांधकामाची अलीकडेच सहाय्यक आयुक्त सुनिल भोईर यांनी पाहणी केली होती. या पाहणी त्यांनी केलेले बांधकाम अनधिकृत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर तक्रारदारांनी सुनिल भोईर यांची भेट घेत अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याची विनंती केली होती. ही कारवाई न करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे दिड लाखांची लाचेची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर अनधिकृत बांधकामावर कारवाई होईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ही लाच देण्याची तयारी दर्शवून १६ जानेवारी त्यांनी सहाय्यक आयुक्त सुनिल भोईर यांच्याविरुद्घ मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची दुसर्या दिवशी शहानिशा करण्यात आली होती. यावेळी सुनिल भोईर यांनी दिड लाखाऐवजी एक लाख तीस हजार रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. त्याचा पहिला हप्ता म्हणून त्यांना पन्नास हजार रुपये घेऊन कार्यालयात बोलाविण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे शनिवारी १८ जानेवारीला तक्रारदार पन्नास हजार रुपयांचा पहिला हप्ता घेऊन त्यांच्या कार्यालयात आले होते. यावेळी सुनिल भोईर यांच्या वतीने बीट निरीक्षक अमोल वारघडे यांनी त्यांच्याकडून ही लाच घेतली होती. यावेळी तिथे सापळा लावलेल्या अधिकार्यांनी अमोलला रंगेहाथ पकडले. त्यांच्या अटकेनंतर सुनिल भोईर यांना लाचप्रकरणी पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर या दोघांनाही दुसर्या विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना बुधवार २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अप्परप पोलीस उपआयुक्त अनिल तुकाराम घेरडीकर, राजेंद्र गणपत सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त गिरीश माणगांवे, पोलीस निरीक्षक रविंद्र लाभांते यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी सांगितले.