मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 ऑगस्ट 2025
मुंबई, – ड्रग्ज तस्करी करणार्या तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेऊन गेल्या दहा दिवसांत चार वेगवेगळ्या कारवाईत पाच आरोपींना अटक केली. त्यात एका नायजेरीयन नागरिकाचा समावेश आहे. या आरोपींकडून पोलिसांनी चार किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला असून या ड्रग्जची किंमत सुमारे दहा कोटी रुपये इतकी किंमत आहे. या पाचजणांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत एमडी ड्रग्जला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे एमडी ड्रग्जच्या तस्करीत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे एमडी ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांच्या स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना 28 जुलैला जोगेश्वरी येथे काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्यांनी तिथे साध्या वेशात गस्त सुरु केली होती. या गस्तदरम्यान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी 504 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्याच्या चौकशीतून त्याच्या अन्य एका सहकार्याचे नाव समोर आले होते. त्यानंतर या पथकाने त्याच्या सहकार्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 518 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी 1022 ग्रॅम वजनाचे ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत 2 कोटी 55 लाख रुपये इतकी आहे.
दुसर्या कारवाईत गुरुवार 7 ऑगस्टला वांद्रे युनिटच्या अधिकार्यांनी मालाडच्या पठाणवाडी परिसरात कारवाई करुन एका तरुणाला ताबयात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी 766 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले. त्याची किंमत 1 कोटी 91 लाख रुपये इतकी आहेत. या कारवाईपूर्वी 2 ऑगस्टला याच युनिटच्या अधिकार्यांनी नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरातून एका नायजेरीयन नागरिकाला अटक केली. या नागरिकाकडून पोलिसांनी 2 कोटी 56 लाख रुपयांचे 1556 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. याच गुन्ह्यांत नंतर अन्य एका आरोपीस पोलिसांनी एमडी ड्रग्जसहीत अटक केली होती. या दोघांकडून पोलिसांनी 1556 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत 3 कोटी 89 लाख रुरपये इतकी आहे.
अन्य एका कारवाईत वरळी युनिटच्या अधिकार्यांनी गुरुवार 7 ऑगस्टला दादर येथे एमडी ड्रग्जची विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीस अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 690 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत 1 कोटी 72 लाख रुपये आहे. अशा प्रकारे गेल्या दहा दिवसांत अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या जोगेश्वरी, दादर, मालाड आणि नवी मुंबईत कारवाईत करुन पाच आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडून 4 किलो 034 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत दहा कोटी सात लाख रुपये इतकी आहे. अटकेनंतर या सर्वांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यापैकी दोघांना न्यायालयीन तर तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे, घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल ढोले, वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्यासह त्यांच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचार्यांनी केली.