रेल्वे अपघातात भावाचा मृत्यू तर दोन अल्पवयीन मुले मिसिंग

अपघातासह अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांचा तपास सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 सप्टेंबर 2025
मुंबई, – दारुच्या नशेत रागाच्या भरात दोन्ही अल्पवयीन मुलांना घेऊन निघालेल्या भावाचा वडाळा येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला तर त्याचे आठ आणि पाच वर्षांचे दोन्ही मिसिंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई सेंट्रल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून मिसिंग झालेल्या मुलांचा शोध सुरु आहे. भावाचा मृत्यू आणि त्याचे दोन्ही मुले मिसिंग झाल्याने तक्रारदारासह त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दोन्ही मुलांचा शोध घेण्याची विनंती तक्रारदाराकडून रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली आहे.

मगन गुलाब बारेला हे जळगाव येथील आव्हाने-शिवार, शिवमनगरचे रहिवाशी असून व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांचा बालकृष्ण हा लहान भाऊ आहे. त्याला रोहन आणि अंकित नावाचे अनुक्रमे आठ आणि पाच वर्षाचे दोन मुले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तो त्याच्या मुलासोबत मगन बारेला यांच्याच घरी राहत होता. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. त्यातून तो अनेकदा घरातून निघून जात होता. मात्र काही वेळानंतर परत येत होता. 8 सप्टेबरला तो त्याच्या दोन्ही मुलांना घेऊन त्याच्या घरातून निघून गेला होता. यावेळी त्याने भरपूर मद्यप्राशन केले होते. त्यामुळे मगनने त्याला उद्या जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन बाळकृष्ण हा रोहन आणि अंकितसोबत घरातून निघून गेला.

12 सप्टेंबरला त्यांना एका अज्ञात व्यक्तीच्या मोबाईलवरुन बाळकृष्णने कॉल केला होता. त्यात त्याने तो भरुच-दादर एक्सप्रेसमधून मुंबईत जात होता. झोप लागल्याने तो गाडीत झोपला होता, याच संधीचा फायदा घेऊन कोणीतरी त्याच्या दोन्ही मुलांचे अपहरण केले आहे. या दोन्ही मुलांचा तो शोध घेत आहेत. मात्र त्याला अद्याप त्याचे मुले सापडले नाही असे सांगितले. त्यानंतर त्यांनी बाळकृष्णाच्या फोनची वाट पाहिली, मात्र त्याचा कॉल आला नाही. या घटनेनंतर 16 सप्टेंबरला ते मुंबईत आले आणि त्यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात त्यांचा भाऊ बाळकृष्ण व त्याचे दोन्ही मुले रोहन व अंकित यांची मिसिंग तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याचा तपास जळगाव येथील तालुका पोलीस ठाण्यात वर्ग केला होता. त्यानंतर ते स्वत जळगावला निघून गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी प्रभारी अधिकार्‍यांची भेट घेतली होती.

20 सप्टेंबरला रात्री दहा वाजता त्यांना वडाळा रेल्वे पोलिसांचा कॉल आला होता. त्यांनी एका व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून तो मृतदेह त्यांचा भाऊ बाळकृष्ण याचा असल्याची शंका व्यक्त केली होती. त्यामुळे ते पुन्हा मुंबईत आले होते. जे. जे हॉस्पिटलमध्ये मृतदेहाची पाहणी केल्यानंतर त्यांना तो मृतदेह बाळकृष्ण असल्याचे दिसून आले. मात्र त्याच्यासोबत त्याची दोन्ही मुले नव्हते.

17 सप्टेंबरला लोकलमधून प्रवास करताना बाळकृष्णचा अपघात झाला होता, त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे नंतर वडाळा रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर त्यांनी पुन्हा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात धाव घेऊन रोहन आणि अंकितची मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. जळगाव-दादर यादरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने या दोन्ही मुलांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page