मुंबईतील न्यायालयीन कर्मचार्यासाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन
मरिनड्राईव्ह येथील पोलीस जिमखाना मैदानात सामने होणार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मार्च 2025
मुंबई, – मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवनिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी 31 मार्च 2025 रोजी सकाळी नऊ वाजता मरिनड्राईव्ह येथील पोलीस जिमखाना येथे या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आल्याचे समितीचे पदाधिकारी चंद्रकांत बनकर यांनी सांगितले.
मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षी भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाही मुंबईतील सर्व न्यायालयीन कर्मचार्यासाठी समितीच्या वतीने क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी 31 मार्चला मरिनड्राईव्ह येथील पोलीस जिमखाना मैदानात संबंधित क्रिकेट सामने होणार आहेत. त्यात मुंबई उच्च न्यायालय, शहर दिवाणी व सत्र न्यायालय, लघुवाद न्यायालय, मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय आणि औद्योगिक व कामगार न्यायालय असे पाच न्यायालयीन संघ सामिल होणार आहेत. विजयी संघांना प्रथम आणि द्वितीय पारितोषिक म्हणून आकर्षक चषक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे.
या क्रिकेट सामन्यासाठी काही नियम व अटी लागू असणार आहे. त्यात प्रत्येक सामना सहा चषकाचा असेल, पंचाचा निर्णय अंतिम राहिल, एलबीडब्ल्यू सोडून सर्व नियम लागू राहतील. चेंडू संयोजकाकडून घ्यावा लागेल, सामने वेळेवर सुरु होतील. तक्रार झाल्यास दोन्ही संघ बाद करण्यात येतील. तसेच नियमांमध्ये फेरफार करण्याचे सर्व अधिकार समितीकडे राहतील. संपर्कसाठी रवी पवार, शरद साळवे, चंद्रकांत बनकर, शिवराम सोनकवडे, संजय शेलार, किरण कांबळे, सुभाष बैसाने आणि अमोल साळवे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यासाठी आले आहे.