मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती
विशेष पोलीस आयुक्तपदावरुन पोलीस आयुक्त म्हणून बढती
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 एप्रिल 2025
मुंबई, – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचा नवीन पोलीस आयुक्त कोण होणार याची चर्चा सुरु असताना बुधवारी सकाळी गृहमंत्रालयाने मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती केली. सायंकाळी पोलीस आयुक्तालयात देवेन भारती यांनी मावळते पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडून आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील आयपीएस अधिकारी म्हणून देवेन भारती यांना ओळखले जात असून त्यांच्यासाठी मुंबई पोलीस दलात पहिल्यांदा विशेष पोलीस आयुक्त पद तयार करण्यात आले होते. विशेष पोलीस आयुक्तपदावरुन त्यांना पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे. मुंबई शहराचा दांडगा अनुभव असलेले देवेन भारती पोलीस आयुक्त झाल्याने मुंबई पोलीस दलात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.
विवेक फणसळकर हे 30 एप्रिलला निवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी कोणाची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होणार याबाबत चर्चा होती, अखेर बुधवारी सकाळी गृहमंत्रालयातून देवेन भारती यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. सायंकाळी त्यांनी विवेक फणसळकर यांच्याकडून पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना देवेन भारती यांनी मुंबईकरांना प्रभावी पोलीस सेवा देण्यासाठी आपण प्रयत्न करु असे सांगून राज्य शासनाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. ती जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागणार असल्याचे सांगितले. शहरात कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करुन पोलीस दलातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना फायदा होईल, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु असे सांगितले. काही ठिकाणी कमरता असल्यास तिथे तंत्रज्ञानाच्या वापर करुन भरुन काढण्याचा प्रयत्न करणार. सायबर गुन्हेगारी मुंबईसह देशभरात मोठे आव्हान आहे. सध्या मुंबई पोलिसाकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून येत्या काही दिवसांत त्यात आणखीन सुधारणा केल्या जातील. अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल असेही सांगितले. मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली जाईल. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करु असे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले.
देवेन भारती 1994 ब्रॅचचे अधिकारी असून 2023 साली त्यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याासाठी ते पद तयार करण्यात आले होते. देवेन भारती हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास मर्जीतील आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. तीन दशकाच्या कालावधीत त्यांनी राज्यासह केंद्रात विविध पदांवर काम केले आहे. मुंबई शहरात त्यांनी सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त म्हणून काम केले आहे. त्यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या सहपोलीस आयुक्तपदाचा सर्वाधिक कालावधी काम केले होते. राज्य एटीएसचे त्यांनी नेतृत्व केले होते. अनेक हायप्रोफाईल गुन्ह्यांचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता. त्यात 26/11 च्या दहशतवादी हल्ला, पत्रकार जे. डे यांची हत्या, फरीद तानाशा प्रकरणाचा समावेश आहे. देवेन भारती यांचा मुंबई पोलीस दलात काम करण्याचा दांडगा अनुभव होता.
दुसरीकडे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले, नायगाव येथील पोलीस मैदानात त्यांना शासकीय निरोप देण्यात आला. यावेळी मुंबई पोलीस दलातील सर्वच आयपीएस अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी विवेक फणसळकर हे पोलीस आयुक्तालयात आले आणि त्यांनी आपल्या पदाचा चार्ज देवेन भारती यांच्याकडे सोपविला होता. त्यानंतर पोलीस आयुक्तालयात त्यांना बँड पथकाच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला होता.