एमडी ड्रग्ज तस्करीचा नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोकडून पर्दाफाश
६१ कोटीच्या एमडी व ६९ लाखांच्या कॅशसहीत तिघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ जून २०२४
मुंबई, – मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज विक्री करणार्या एका टोळीचा मुंबई युनिटच्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांना डोंगरी अणि वडाळा येथून अटक करण्यात या अधिकार्यांना यश आले आहे. या कारवाईत या अधिकार्यांनी ६१ कोटी रुपयांचे ३१ किलो ५०० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आणि सुमारे ६९ लाख रुपयांची कॅश जप्त केली आहे. चालू वर्षांत एनसीबीकडून इतक्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेला सर्वांत मोठा साठा आहे. या तिन्ही आरोपींच्या चौकशीतून त्यांच्या इतर सहकार्यांची नावे उघडकीस आली असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात एमडी ड्रग्जला प्रचंड मागणी असून या ड्रग्जची तस्करी करणार्या अनेक टोळ्यांचा एनसीबीसह मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला होता. तरीही या टोळ्यांचा कारवाया सुरुच होत्या. त्यामुळे या टोळ्यांविरुद्ध एनसीबीने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना डोंगरी परिसरात एमडी ड्रग्ज तस्करी करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर एनसीबीचे मुंबई युनिटचे प्रमुख अमीत धावटे यांच्या पथकाने या आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान डोंगरी येथून मुर्शरफ जे. के नावाच्या एका संशयिताला या अधिकार्यांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दहा किलोचे एमडी ड्रग्ज जप्त केले. त्याच्या चौकशीतून नौशीन या महिलेचे नाव समोर आले होते. नौशीन ही डोंगरी परिसरात राहत होती, त्यामुळे या अधिकार्यांनी तिच्या राहत्या घरातून तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्या घराच्या झडतीत या अधिकार्यांना दहा किलो एमडी ड्रग्ज आणि ड्रग्ज विक्रीतून आलेली ६९ लाख १३ हजार ३०० रुपयांची कॅश सापडली. त्यांच्या चौकशीतून सैफ याचे नाव समोर आले होते, त्यानंतर सैफला अन्य एका पथकाने वडाळा येथून शिताफीने अकरा किलो एमडी ड्रग्जसहीत अटक केली.
या तिन्ही कारवाईत या अधिकार्यांनी ३१ किलो ५०० ग्रॅम वजनाचे एमडी जप्त जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ६१ कोटी इतकी किंमत आहे. या ड्रग्जसहीत ६९ लाखांची कॅशही जप्त करण्यात आली आहे. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या एनसीबी कोठडीत आहे. तपासात ही टोळी गेल्या एक वर्षांपासून एमडी ड्रग्ज तस्करीमध्ये सक्रिय होती. या कालावधीत त्यांनी अनेक ड्रग्ज पेडलरच्या मदतीने मुंबईसह आसपासच्या परिसरात ड्रग्जची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात या अधिकार्यांना यश आले आहे.