६२ कोटीच्या एमडी ड्रग्ज तस्करीच्या मुख्य आरोपीस अटक

वाशीतील लॉजमध्ये नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ जुलै २०२४
मुंबई, – सुमारे ६२ कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी सुफीयान खान याला वाशीतील एका लॉजमधून नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने एनसीबी कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली होती, या आरोपींकडून सुमारे ६२ कोटीचे ३१ किलो ५०० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जसहीत ६९ लाखांची कॅश जप्त केली होती. या तिघांच्या अटकेनंतर सुफियान हा पळून गेला होता, अखेर त्याला वीस दिवसांनी अटक करण्यात एनसीबीच्या मुंबई युनिटला यश आले आहे.

गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात एमडी ड्रग्जला प्रचंड मागणी असून या ड्रग्जची तस्करी करणार्‍या अनेक टोळ्यांचा एनसीबीसह मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला होता. तरीही या टोळ्यांचा कारवाया सुरुच होत्या. त्यामुळे या टोळ्यांविरुद्ध एनसीबीने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना २७ जूनला डोंगरी परिसरात एमडी ड्रग्ज तस्करी करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर एनसीबीचे मुंबई युनिटचे प्रमुख अमीत धावटे यांच्या पथकाने या आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान डोंगरी येथून मुर्शरफ जे. के नावाच्या एका संशयिताला या अधिकार्‍यांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दहा किलोचे एमडी ड्रग्ज जप्त केले. त्याच्या चौकशीतून नौशीन या महिलेचे नाव समोर आले होते. नौशीन ही डोंगरी परिसरात राहत होती, त्यामुळे या अधिकार्‍यांनी तिच्या राहत्या घरातून तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्या घराच्या झडतीत या अधिकार्‍यांना दहा किलो एमडी ड्रग्ज आणि ड्रग्ज विक्रीतून आलेली ६९ लाख १३ हजार ३०० रुपयांची कॅश सापडली. त्यांच्या चौकशीतून सैफ याचे नाव समोर आले होते, त्यानंतर सैफला अन्य एका पथकाने वडाळा येथून शिताफीने अकरा किलो एमडी ड्रग्जसहीत अटक केली. या तिन्ही कारवाईत या अधिकार्‍यांनी ३१ किलो ५०० ग्रॅम वजनाचे एमडी जप्त जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ६१ कोटी इतकी किंमत आहे. या ड्रग्जसहीत ६९ लाखांची कॅशही जप्त करण्यात आली होती.

तपासात ही टोळी गेल्या एक वर्षांपासून एमडी ड्रग्ज तस्करीमध्ये सक्रिय होती. या कालावधीत त्यांनी अनेक ड्रग्ज पेडलरच्या मदतीने मुंबईसह आसपासच्या परिसरात ड्रग्जची विक्री केल्याचे उघडकीस आले होते. सुफियान हा त्यांचा मुख्य सहकारी होता. त्याच्याच सांगण्यावरुन ही टोळी एमडी ड्रग्जची डिलीव्हरी करत होती. मात्र त्यांच्या अटकेनंतर सुफियान हा पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी एनसीबीने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना तो वाशीतील एका लॉजमध्ये लपला असल्याची माहिती या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने सोमवारी रात्री वाशीतील एका लॉजमधून सुफियानला अटक केली. तो ड्रग्ज सिंडीकेटचा म्होरक्या असून शिवडीतून संपूर्ण काम हाताळत होता. त्याच्याविरुद्ध ड्रग्ज तस्करीचे अनेक गुन्हे दाखल असून काही गुन्ह्यांत त्याला वॉण्टेड आरोपी घोषित करण्यात आले आहे. सुफियानच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेनंतर त्याला मंगळवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टात त्याला एनसीबी कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page