मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२४
मुंबई, – गेल्या काही महिन्यांत विविध कारवाई नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई युनिटने जप्त केलेला सुमारे ५२ कोटीचा ड्रग्ज नष्ट करण्यात आला. त्यात एमडी, कोकेन, हेरॉईन, गांजासह कोडेन सिरप असा ५ हजासर ४८९ किलोचा ड्रग्जचा समावेश आहे. उच्चस्तरीय औषध विल्हेवाट समितीच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मुंबई युनिटच्या एनसीबीच्या अधिकार्यांनी मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी तसेच गोवा येथे कारवाई करुन काही ड्रग्ज तस्करांना अटक केली होती. त्यात स्थानिकासह काही विदेशी ड्रग्ज तस्कराचा समावेश होता. या कारवाईत या अधिकार्यांनी सुमारे ५२ कोटीचे १० किलो कोकेन, एमडी, हेरॉईन, गांजा आणि ५२ हजार १३० कोडेन सिरपचा साठा जप्त केला होता. नवी मुंबईतील तळोजा परिसरातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीत गुरुवारी आणि शुक्रवारी जप्त केलेले ड्रग्ज नष्ट करण्यात आले. एचएलडीडीसीच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी एनसीबीचे काही निवडक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सुमारे ५२ कोटीचे ड्रग्ज नष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.