मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – गेल्या वर्षभरात मुंबई युनिटच्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी कोट्यवधी रुपयांचे विविध ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. हा साठा शुक्रवारी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडमध्ये नष्ट करण्यात आला आहे. यावेळी एनसीबीचे काही प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. एकूण ९५ गुन्ह्यांत या अधिकार्यांनी ९८२ किलो १०० ग्रॅम वजनाचा विविध ड्रग्जचा साठा जप्त केल्याचे एनसीबीचे अतिरिक्त संचालक अमीत घावटे यांनी दिली.
मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांसह अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेसह मुंबई युनिटच्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. गेल्या वर्षभरात एनसीबीच्या अधिकार्यांनी ड्रग्ज तस्करीप्रकरणी काही आरोपींना अटक केली होती. या कारवाईत या अधिकार्यांनी ९८२ किलो १०० ग्रॅम वजनाचे विविध ड्रग्जचा साठा जप्त केला होता. या ड्रग्जमध्ये गेल्या वर्षी जून महिन्यांत डोंगरी येथून जप्त केलेल्या वीस किलो एमडी ड्रग्जचा समावेश आहे. या गुन्ह्यांत कटातील किंगपिन, फायनान्सर, प्रमुख सहकारी आणि ड्रग्ज पेडलर आदींचा समावेश होता. या सर्व आरोपींकडून कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात एनसीबीला यश आले होते. नष्ट करण्यात आलेल्यांमध्ये इतर ड्रग्जमध्ये गांजा, मेफेड्रोन, इफेड्रिन, सीबीसीएस, नायट्राझेपाम गोळ्या, हेरॉईन, कोकेन, एमडीएमए/एक्सटसी, मेथॅम्फेटामाईन, चरस, अफू, झोलपीडेम, अल्प्राझोलम आणि ट्रामाडोल आदींचा समावेश होता.
याच गुन्ह्यांत अटक केलेले आरोपी आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य ड्रग्ज तस्करीतील मुख्य आरोपी आहेत. विशेष म्हणजे त्यात काही विदेशी नागरिकांचा समावेश होता. या ड्रग्जची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष एनडीपीएस कोर्टाची परवानगी घेण्यात आली होती. कोर्टाच्या आदेशानंतर मार्गदर्शक सूचनेनुसार एक नियमित औषध विल्हेवाट समिती स्थापन केली होती. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता करुन जप्त केलेला कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा शुक्रवारी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे नष्ट करण्यात आला.