विविध कारवाईत चार कोटीच्या ड्रग्जसहीत अकराजणांना अटक
मानखुर्द, गोवंडी, धारावी, मालवणी, अंधेरी, मरोळ, येथे छापा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ डिसेंबर २०२४
मुंबई, – गेल्या आठवड्याभरात मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे चार कोटीच्या ड्रग्जसहीत अकराजणांना अटक केली. मानखुर्द, गोवंडी, धारावी, मालवणी, अंधेरी मरोळ परिसरात छापा टाकून या अधिकार्यांनी ४ किलो ६६९ ग्रॅम वजनाचे चरस, २३९५ कोडेन बॉटल्स, ३०५ ग्रॅम हेरॉईन, १३६ ग्रॅम कोकेन आणि २९६ ग्रॅम वजनाचे एमडी आदी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. अटक आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत सर्व आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांना देण्यात आले होते. या आदेशानंतर मानखुर्द आणि गोवंडी परिसरात घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी बुधवारी ११ डिसेंबरला कारवाई केलीद होती. यावेळी तिथे चरस विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांी १ किलो २०२ ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले होते. त्याच्या चौकशीनंतर या पथकाने मानखुर्द येथील मंडाला परिसरात कारवाई करुन आणखीन ३ किलो ४६७ ग्रॅम वजनाचा चरसचा साठा जप्त केला. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी ४ किो ६६९ ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले असून त्याची किंमत एक कोटी चाळीस लाख रुपये इतकी आहे.
दुसर्या कारवाईत आझाद मैदान युनिटच्या अधिकार्यांनी धारावी परिसरात कारवाई केली. मंगळवारी १७ डिसेंबरला केलेल्या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी २३९७ कोडेन फॉस्फेटमिश्रीत कफ सिरपच्या बॉटल्स जप्त केल्या आहेत. त्याची किंमत सुमारे बारा लाख रुपये इतकी आहे. तिसर्या कारवाईत मालाडच्या मालवणी परिसरात कांदिवली युनिटने एका तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ३०५ ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे हेरॉईन सापडले. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे सव्वाकोटी इतकी आहेत. हेरॉईन जप्त केल्यानंतर त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. अशाच अन्य एका कारवाईत कांदिवली युनिटचे १६ डिसेंबरला अंधेरीतील मरोळ परिसरातून कोकेन विक्रीसाठी आलेल्या एका नायजेरीयन नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी १३६ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले असून त्याची किंमत ६८ लाख १५ हजार रुपये इतकी आहे. अन्य ठिकाणी केलेल्या कारवाई वरळी युनिटने ११ डिसेंबरला काळाचौकी येथून एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १०७ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले.
अशाच दुसर्या कारवाई वरळी युनिटने १३ डिसेंबरला सायन-धारावी लिंक रोडवरुन ४० ग्रॅम एमडी ड्रग्जसहीत एका तरुणालाद अटक केली. त्यानंतर आझाद मैदान युनिटने १२ डिसेंबरला माझगाव-डॉकयार्ड परिसरातून अन्य एका तरुणाला ४१ ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जसहीत अटक केली. १४ डिसेंबरला वांद्रे युनिटने अंधेरीतील डोगर परिसरातून अन्य एका तरुणाला एमडी ड्रग्जप्रकरणी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ४३ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. त्याच दिवशी कांदिवली युनिटने गोरेगाव येथील संतोषनगर परिसरातून एमडी विकीसाठी आलेल्या एका आरोपीस अटक करुन त्यासच्याकडून २१ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. दोन दिवसांनी म्हणजे १६ डिसेंबरला घाटकोपर युनिटने अंधेरीतील डी. एन नगर परिसरातून अन्य एका आरोपीस ४४ ग्रॅम एमडी ड्रग्जसहीत अटक केली. याच पथकाने गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातून ६६० ग्रॅम वजनाचा गांजासह एका आरोपीस अटक केली होती.
अशा प्रकारे मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी मानखुर्द, गोवंडी, धारावी, मालाडच्या मालवणी, अंधेरीतील मरोळ, काळाचौकी, सायन, माझगाव-डॉकयार्ड, अंधेरी डोंगर, गोरेगाव-संतोषनगर, गोवंडी शिवाजीनगर, अंधेरीतील डी. एन नगर परिसरातून ४ किलो ६६९ ग्रॅम वजनाचे चरस, २३९५ कोडेन फॉस्फेटमिश्रीत कफ सिरप बॉटल्स, ३०५ हेरॉईन, १३६ ग्रॅम कोकेन, २९६ एमडी, ६६० ग्रॅम गांजा आदी ड्रग्जचा साठा जप्त केला असून त्याची किंमत चार कोटी एक लाख रुपये इतकी आहे. या कारवाईत आतापर्यंत अकराजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर युनिटचे प्रभारी अनिल ढोले, आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, वांद्रे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात, कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्यासह त्यांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी केली.