ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांतील तिघांवर स्थानबद्धेची कारवाई
तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 मार्च 2026
मुंबई, – ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांतील तिघांवर घाटकोपर युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी स्थानबद्धेची कारवाई केली आहे. अहमद मोहम्मद शफी शेख ऊर्फ अकबर खाऊ, मोहम्मद फरीद रेहमतुल्ला शेख ऊर्फ चुहा आणि सर्फराज साबीरअली खान ऊर्फ भुरा अशी या तिघांची नावे आहेत. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. कारवाईनंतर या तिघांनाही वेगवेगळ्या मध्यवती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांच्या स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, एटीएस, अॅण्टी नारकोटीक्स सेलने ड्रग्ज तस्करी करणार्या आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला होता. वारंवार कारवाई करुनही काही तस्कर जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा ड्रग्जची खरेदी-विक्री करत असल्याने अशा सराईत गुन्हेगारावर पोलिसांनी स्थानबद्धेची कारवाई करण्यास सुरुवात केली होती. चालू वर्षांत अशाच सहा ड्रग्ज तस्कराविरुद्ध पोलिसांनी स्थानबद्धेची कारवाई करुन त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली होती.
गेल्या वर्षी घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी अहमद शेख, मोहम्मद फरीद शेख आणि सर्फराज खान या तिघांना ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत अटक केली होती. या तिघांकडून पोलिसांनी एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. याच गुन्ह्यांत त्यांच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. तपासात ते तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले होते.
यातील अहमद शेखविरुद्ध वरळी युनिट, व्ही. बी नगर, कुर्ला, ठाणेनगर तर सर्फराज खानविरुद्ध वांद्रे, वरळी, आझाद मैदान युनिट, कुर्ला पोलीस ठाण्यात प्रत्येकी सात तर मोहम्मद फरीदविरुद्ध व्ही. बी नगर, कुर्ला, घाटकोपर युनिट अॅण्टी नारकोटीक्स सेलमध्ये ड्रग्जच्या सहा गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांची संख्या पाहता त्यांच्यावर स्थानबद्धेची कारवाई सुरु करण्यात आली होती.
वरिष्ठांकडून मंजुरी प्राप्त होताच या तिघांवर घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी एक वर्षांसाठी स्थानबद्धेची कारवाई केली होती. या कारवाईनंतर अहमद शेख याला नागपूर, मोहम्मद फरीदला छत्रपती संभाजीनगर तर सर्फराजला अमरावती मध्यवती कारागृहात पाठविण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले, पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील, गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा अडसुळे, पोलीस निरीक्षक सरीता गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सतीश निंबाळकर यांनी केली.