मुंबई १९९३ दंगलीच्या वॉण्टेड आरोपीस अटक

३१ वर्षांपासून पोलिसांना सतत गुंगारा देत होता

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जुलै २०२४
मुंबई, – बाबरी मशिदीच्या पतनानंतर मुंबई शहरात उसळलेल्या दंगलीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका ६५ वर्षांच्या वयोवृद्ध आरोपीस रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अटक केली. सय्य नादीर शहा अब्बास खान असे या आरोपीचे नाव असून तो गेल्या ३१ वर्षांपासून फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते.

सय्यद हा चालक म्हणून काम करत असून तो शिवडीतील सखाराम लांजेकर मार्ग, इस्माईल इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील रुम क्रमांक दोनमध्ये राहत होता. १९९३ साली त्याच्यासह इतर आरोपीविरुद्ध रफि अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८, १४९, ३०७, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर सय्यद हा पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणसाठी हजर राहत नव्हता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी करुन या गुन्ह्यांत फरार आरोपी घोषित केले. तसेच त्याच्या अटकेचे स्थानिक पोलिसांना आदेश दिले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याच्या घरी जाऊन चौकशी केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना त्याच्याविषयी काहीच माहिती नव्हती. गेल्या ३१ वर्षांपासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या कुटुंबियांचे मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याच्या अटकेसाठी विशेष प्रयत्न सुरु केले होते.

याच दरम्यान सय्यद हा त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी शिवडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जगताप, प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील, श्याम बनसोडे, महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, पोलीस हवालदार सुरेश कडलग, अशोक लादे, निकम, पोलीस शिपाई मधुकर मंडलिक, दळवी, महिला पोलीस शिपाई यादव यांनी शिवडी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या सय्यदला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो दंगलीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. तब्बल ३१ वर्षांनंतर सय्यदला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page