रेल्वे प्रवासादरम्यान चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत
1.80 कोटीचे 1018 मोबाईल परत मिळाल्याने समाधान व्यक्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 डिसेंबर 2025
मुंबई, – रेल्वे प्रवासादरम्यान चोरीस गेलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आला. 1 कोटी 80 लाख रुपयांचे 1018 मोबाईल परत मिळाल्याने या मालकांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे. रेल्वेच्या घाटकोपर येथील रेल्वे मुख्यालयात बुधवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यातील बहुतांशांना त्यांचे चोरीस गेलेले मोबाईल पुन्हा मिळतील याबाबत शाश्वती नव्हती. मात्र रेल्वे पोलिसांनी मुंबईसह महाराष्ट्र तसेच इतर राज्यात जाऊन संबंधित मोबाईल चोरांना अटक करुन त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत.
गेल्या काही वर्षांत मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणार्य उपनगरीय लोकलमध्ये प्रवास करणार्या प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीचे गुन्हे घडत होते. या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी गंभीर दखल घेत सर्व रेल्वे पोलिसांसह गुन्हे शाखेला अशा आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेऊन त्यांच्याकडून जास्तीत जास्त चोरीचे मोबाईल जप्त करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर मध्य परिमंडळच्या रेल्वे पोलीस ठाण्यातील 28 आणि पश्चिम परिमंडळाच्या 29 विशेष पथकाने अशा आरोपींविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यात काही आरोपींना अटक करुन मुंबईसह महाराष्ट्र तसेच इतर राज्यात जाऊन तपास करुन चोरीचे मोबाईल जप्त केले होते. जून आणि जुलै महिन्यांत मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणून 1 कोटी 11 लाख 39 हजार 626 रुपयांचे 686 चोरीचे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले होते. 25 जुलैला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यांत पुन्हा विशेष मोहीम हाती घेऊन 2023 ते 2025 या तीन वर्षांच्या कालावधीत चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले होते.
ते मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना देण्यासाठी बुधवारी 10 डिसेंबरला घाटकोपर येथील मुंबई रेल्वे पोलीस मुख्यालयातील नवरंग सभागृहात एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आला आहे. आतापर्यंत रेल्वे पोलिसांनी 1018 चोरीचे मोबाईल मूळ मालकांना परत केले असून त्याची किंमत 1 कोटी 80 लाख 33 हजार 668 रुपये इतके आहे. त्यात मुंबईतून 444, महाराष्ट्रातील इतर शहरातून 216, इतर राज्यातून 358 असे एकूण 1018 मोबाईल जप्त करण्यात आले होते.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, सुनिता साळुंखे-ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी व अन्य पोलीस पथकाने सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश जगन्नाथ खाडे यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने केली होती. यावेळी पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांच्या कामाचे कौतुक करताना ही मोहीम आगामी दिवसांत अशीच सुरु राहणार असल्याचे सांगितले.