पंधरा हजाराची लाच घेताना मनपाच्या दोघांसह तिघांना अटक

दुकानावर कारवाई न करण्यासाठी लाचेची केली होती मागणी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – परवाना नसल्याने दुकानावर कारवाईचा धमकीवजा इशारा देऊन कारवाई न करण्यासाठी दुकान मालकाकडे वीस हजाराची लाचेची मागणी करुन पंधरा हजार रुपयांची लाच घेताना महानगरपालिकेच्या के-पश्चिम विभागाच्या दोन कर्मचार्‍यासह तिघांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यात अनुज्ञापन निरीक्षक अविनाश शांताराम कांबळे, शिपाई प्रदीप प्रभाकर खंडागळे आणि खाजगी व्यक्ती राजू अर्जुन देठे यांचा समावेश आहे. यातील अविनाश कांबळे आणि प्रदीप खंडागळे हे दोघेही अंधेरीतील महानगरपालिकेतील के-पश्चिम विभागातील अनुज्ञापन कार्यालयातील कर्मचारी तर राजू देठे हा सहेली सायबर कॅफेचा चालक आहे. त्यानेच या दोघांच्या वतीने लाचेची ही रक्कम घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

यातील तक्रारदाराच्या मालकीचे अंधेरीतील डी. एन नगर परिसरात एक दुकान आहे. ते दुकान त्यांनी भाड्याने दिले होते. गुरुवारी 9 ऑक्टोंबरला या दुकानात अविनाश कांबळे आले होते. त्यांनी दुकानातील कागदपत्रांची मागणी करुन या कागदपत्रांची तपासणी केली होती. त्यात त्यांना महानगरपालिकेच्या अ‍ॅक्ट कलम 313 अन्वये परवाना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी दुकानातील भाडेकरुला दुकानाच्या मालकाला त्यांच्या कार्यालयात भेटण्यास सांगितले होते. या भाडेकरुने मालकांना ही माहिती सांगून अविनाश कांबळे यांची भेट घेण्यास सांगितले होते.

शुक्रवारी 10 ऑक्टोंबरला तक्रारदार अविनाश कांबळे यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी अविनाश कांबळे यांनी बीएमसी अ‍ॅक्ट 313 अन्वये परवाना नसल्याचे सांगून त्यांच्या दुकानात कारवाई होणार असल्याचे सांगितले. दुकान सुरु ठेवायचे असेल तर त्यांना वीस हजार रुपये द्यावे लागतील, नाहीतर त्यांच्या दुकानावर कारवाई करण्याची धमकीवजा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याची संबंधित अधिकार्‍यांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात अविनाश कांबळे यांनी त्यांच्याकडे वीस हजाराची लाचेची मागणी केली.

ही रक्कम जास्त असल्याने पंधरा हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविली होती. तसेच लाचेची रक्कम न दिल्यास त्यांच्या दुकानात कारवाईची धमकी दिली होती. त्यानंतर या अधिकार्‍यांनी के-पश्चिम कार्यालयाजवळ सापळा लावला होता. ठरल्याप्रमाणे बुधवारी तक्रारदार पंधरा हजाराचा पहिला हप्ता घेऊन त्यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी कार्यालयातील शिपाई प्रदीप खंडागळे यांनी सायबर कॅफेतील खाजगी व्यक्ती राजू देठे याला पंधरा हजार रुपये देण्यास सांगितले. त्यांनतर तक्रारदारांनी राजू देठे याला पंधरा हजार रुपये दिले होते. यावेळी या अधिकार्‍यांनी त्याला लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले.

त्याच्या चौकशीत त्याने ही लाच अविनाश कांबळे आणि प्रदीप खंडागळे यांच्या सांगण्यावरुन घेतल्याचे सांगितले. त्यानंतर या दोघांनाही लाचेच्या गुन्ह्यांत या अधिकार्‍यांनी अटक केली. मनपाच्या एका निरीक्षकासह शिपायाला लाचप्रकरणी अटकेची माहिती समजताच तिथे उपस्थित पालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page