परवान्यासाठी लाच घेणार्या सहाय्यक अभियंताला अटक
चार लाखांची मागणी करुन एक लाख घेताना एसीबीची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 नोव्हेंबर 2025
मुंबई, – परवान्यासाठी लाच घेणार्या विद्युत निरीक्षक कार्यालयातील सहाय्यक अभियंता गजानन प्रल्हाद राठोड यांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. परवान्यासाठी सुरुवातीला एक लाख ऐंशी हजाराची मागणी करणार्या गजानन राठोड यांनी अचानक चार लाखांची मागणी करुन एक लाखांचे टोकन आणून देण्यास सांगितले होते, टोकनची एक लाखांची लाच घेतानाच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अटकेनंतर त्यांना शुक्रवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
कुर्ला येथील एलबीएस मार्गवर विद्युत निरीक्षक यांचे एक कार्यालय असून तिथे गजानन राठोड हे सहाय्यक अभियंता म्हणून कामाला आहे. यातील तक्रारदाराची पत्नीची एक खाजगी कंपनी असून तिथे ते प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कामाला आहेत. या कंपनीमार्फत विद्युत उद्वाहन स्थापित करणे, त्याची देखभाल करणे आदी काम केली जाते. 16 ऑक्टोंबरला त्यांनी कामानिमित्त सांताक्रुज येथील उर्जा खात्यात ठेकेदार फाईल म्हणून एक अर्ज सादर केला होता. मात्र या अर्जावर काहीच कारवाई झाली होती. त्यामुळे तक्रारदार स्वत संबंधित कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी सहाय्यक अभियंता गजानन राठोड यांची भेट घेतली होती.
या भेटीदरम्यान त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या कामासाठी एक लाख ऐंशी हजाराची मागणी केली होती. त्यापैकी पन्नास हजार रुपये तात्काळ देण्यास सांगण्यात आले होते. मात्र ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 30 ऑक्टोंबरला वरळीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गजानन राठोड यांच्याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची बुधवारी 12 नोव्हेंबरला शहानिशा करण्यात आली होती. यावेळी गजानन राठोड यांनी त्यांच्या कामासाठी परवानासाठी दुप्पट खर्च येईल असे सांगून चार लाखांची मागणी करुन एक लाख टोकन म्हणून घेऊन येण्यास सांगितले.
या घटनेनंतर या अधिकार्यांनी गुरुवारी संबंधित कार्यालयात सापळा लावला होता. ठरल्याप्रमाणे तक्रारदार एक लाखांची लाच घेऊन गजानन राठोड यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना गजानन राठोड यांना या अधिकार्यांनी रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गजानन राठोड यांच्या अटकेचे वृत्त समजताच तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खखळबळ उडाली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुषमा खोत, गणपत परचाके व अन्य पोलीस पथकाने केली.