मनपाच्या स्वच्छता निरीक्षकाला वीस हजाराची लाच घेताना अटक
भोजनालयावर कारवाई न करण्यासाठी केली होती लाचेची मागणी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 नोव्हेंबर 2025
मुंबई, – महानगरपालिकेच्या दहिसर येथील आर-उत्तर विभागाच्या आरोग्य खात्याचे निरीक्षक दिलीप शंकर सरवदे यांना वीस हजाराची लाचेची रक्कम घेताना सोमवारी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. दहिसर येथील एका भोजनालयाला नोटीस न देण्यासाठी तसेच यापुढे भोजनावर कारवाई न करण्यासाठी दिलीप सरवदे यांनी तीस हजाराची लाचेची मागणी केली होती, त्याचा पहिला हप्ता घेताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मनपाच्या कार्यालयात या अधिकार्यांनी केलेल्या या कारवाईने तिथे उपस्थित मनपा कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार उत्तर मुंबईत राहत असून दहिसर परिसरात त्यांच एक भोजनालय आहे. 10 नोव्हेंबरला तिथे दिलीप सरवदे आले होते. त्यांनी भोजनालयाची तपासणी करुन त्यांच्याकडे फुड लायसन्सची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराकडे फुड लायसन्स नसल्याने त्यांना नोटीस बजावून त्यांच्या भोजनालयातील सर्व सामानावर जप्तीची कारवाई केली होती. 20 नोव्हेंबरला सामान सोडविणयासाठी तक्रारदार दहिसर येथील महानगरपालिकेच्या आर/उत्तर वॉर्डमध्ये गेले होते. त्यांनी स्वच्छता निरीक्षक दिलीप सरवदे यांची भेट घेऊन जप्त केलेले सामान परत करण्याची विनंती केली होती.
यावेळी दिलीप सरवदे यांनी त्यांना नोटीस न देण्यासाठी तसेच यापुढे त्यांच्या भोजनालयात कारवाई न करण्यासाठी वार्षिक तीस हजाराच्या लाचेची मागणी केली होती. मात्र लाचेची रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना वीस हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. 21 नोव्हेंबरला या तक्रारीची संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी दिलीप सरवदे यांनी नोटीस न देण्यासाठी तसेच भोजनालयावर यापुढे कारवाई न करण्यासाठी तीस हजाराची मागणी करुन वीस हजार स्विकारण्याचे मान्य केले होते.
सोमवारी या अधिकार्यांनी संबंधित कार्यालयात सापळा लावला होता. ठरल्याप्रमाणे तक्रारदार वीस हजाराचा हप्ता घेऊन दिलीप सरवदे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याकडून वीस हजाराची लाचेची रक्कम घेताना त्यांना या अधिकार्यांनी रंगेहाथ अटक केली. लाचेच्या गुन्ह्यांत दिलीप सरवदे यांच्यावर झालेल्या कारवाईने तिथे उपस्थित इतर अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
त्यांच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक कायदा 7 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत अटकेनंतर त्यांना मंगळवारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत माळी, पोलीस निरीक्षक दिपीका डंगारणे यांच्यासह इतर पथकाने केली.