एच/पूर्व विभागाच्या मनपाच्या दोन अधिकार्‍यावर गुन्हा दाखल

अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी दिड लाख घेऊन पन्नास हजाराची मागणी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 फेब्रुवारी 2026
मुंबई, – एच/पूर्व विभागाच्या महानगरपालिकेच्या दोन अधिकार्‍यांवर लाचप्रकरणी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कनिष्ठ अभियंता रुपेश कोथरे आणि मुकादम कुकप्पा कादर अशी या दोघांची नावे आहेत. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी या दोघांनी तक्रारदाराकडून दोन लाखांची लाचेची मागणी करुन त्यापैकी दिड लाखाची लाच घेतली तर उर्वरित पन्नास हजारासाठी त्यांच्यावर दबाव आणत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

यातील तक्रारदाराच्या मालकीचे वांद्रे येथील खेरवाडी परिसरात एक मोठा प्लॉट आहे. या प्लॉटवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी एच/पूर्व महानगरपालिका कार्यालयात अर्ज करुन संबंधित अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी अर्ज केला होता. या कामासाठी कनिष्ठ अभियंता रुपेश कोथरे आणि मुकादम कुकप्पा कादर यांची नेमणू करण्यात आली होती. मात्र अर्जानंतर संबंधित अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी रुपेश कोथरे आणि कुकप्पा कादर यांची भेट घेऊन त्यांना अनधिकृत बांधकाम तोडण्याची विनंती केली होती.

ही कारवाई करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्याशिवाय कारवाई होणार नाही असे लक्षात येताच त्यांनी त्यांना दिड लाख रुपये दिले होते. ही रक्कम घेतल्यानंतर ते दोघेही उर्वरित पन्नास हजाराची त्यांच्याकडे मागणी करत होते. ही रक्कम दिल्यानंतर कारवाईला सुरुवात करु असे त्यांनी सांगितले होते. लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 9 जानेवारी 2025 रोजी रुपेश कोथरे आणि कुकप्पा कादर यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची 3 एप्रिल 2025 रोजी शहानिशा करण्यात आली होती.

त्यात या दोघांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी दोन लाखांची मागणी करुन त्यापैकी दिड लाख रुपये घेतल्याची तसेच उर्वरित पन्नास हजाराची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रुपेश कोथरे आणि कुकप्पा कादर यांच्याविरुद्ध लाचेची मागणी करुन पहिला हप्ता घेतल्यानंतर दुसर्‍या हप्त्याची मागणी करुन या रक्कमेचा गैरलाळ मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे हे करत आहेत. पालिकेच्या दोन्ही अधिकार्‍यांवर लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एच-पूर्व विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page