नाशिकच्या राज्य कर उपायुक्तासह तिघांना लाचप्रकरणी अटक
सव्वाकोटीची मागणी करुन वीस हजाराचा हप्ता घेताना कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 मार्च 2026
मुंबई, – जीएसटी कारवाईबाबत सहकार्य करण्यासाठी एका व्यावसायिकाकडून सव्वाकोटीच्या लाचेची मागणी करुन वीस लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना नाशिकच्या राज्य कर उपायुक्तासह तिघांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अटक आरोपींमध्ये राज्यकर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे, सहाय्यक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे आणि खाजगी व्यक्ती अमीत हिरामण जाधव यांचा समावेश असून यातील सोमनाथ पागे आणि मच्छिंद्र दोंदे हे नाशिकच्या वस्तू आणि सेवाकर विभागातील अधिकारी आहे. त्यांनी तक्रारदार व्यावसायिकाकडे सव्वाकोटीची मागणी करुन एक कोटीवर तडजोड करुन पहिला हप्ता देण्यासाठी तगादा लावला होता. त्यानंतर मुंबई युनिटच्या अधिकार्यांनी नाशिक येथील कार्यालयात सापळा लावून ही कारवाई केली.
यातील तक्रारदार मूळचे नाशिकचे रहिवाशी असून व्यवसायाने व्यावसायिक आहेत. नाशिकच्या दामोदर चौकात त्यांचे एक कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयात नाशिकच्या वस्तू आणि सेवाकर कार्यालयाकडून जीएसटीची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. याच संदर्भात चर्चा करण्यासाठी तक्रारदारांनी राज्यकर उपायुक्त सोमनाथ पागे आणि सहाय्यक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र दोंदे यांची भेट घेतली होती. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन त्यांना या संपूर्ण प्रकरणात मदत करण्याची विनंती केली होती. या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध कारवाईसह मदत करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे सव्वाकोटीच्या लाचेची मागणी केली होती.
मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांच्यात एक कोटीमध्ये तडजोड झाली होती. त्यापैकी वीस लाख रुपयांचा पहिला हप्ता त्यांना लवकरात लवकर देण्यास सांगण्यात आले होते. लाच देण्याची तयारी दर्शवून 1 मार्च 2026 रोजी त्यांनी त्यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर 4 मार्चला त्याची संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात सोमनाथ पागे आणि मच्छिंद्र दोंदे यांनी एक कोटीची मागणी करुन पहिला हप्ता वीस लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले होते. या दोघांकडून लाचेची मागणी करण्यात आल्याचे उघडकीस येताच या पथकाने शुक्रवारी 6 मार्चला नाशिकच्या वस्तू आणि सेवाकार कार्यालयात सापळा लावला होता.
यावेळी या दोघांच्या वतीने अमीत जाधव या खाजगी व्यक्तीने वीस लाख रुपयांचा हप्ता घेतला होता. ही रक्कम घेताना त्याला या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. चौकशीत त्याने सोमनाथ पागे आणि मच्छिंद्र दोंदे यांच्या वतीने वीस लाखांची लाच घेतल्याची कबुली दिली होती. त्यानंतर या दोन्ही अधिकार्यांना पोलिसांनी अटक केली. या तिघांविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7, 7 अ, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अप्पर पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चव्हाण व पथकाने केली.