दिड लाखांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक
आमच्याकडे तेवढे बघा बोलून लाचेची मागणी करणे महागात पडले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मार्च 2026
मुंबई, – प्रॉपटीसंदर्भात वांद्रे लोकल कोर्टाने दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर अहवाल बाजूने देण्यसाठी तीन लाखांची लाचेची मागणी करुन दिड लाख रुपयांचा लाचेचा हप्ता घेताना खार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार तात्यासाहेब काळे यांना सोमवारी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. आमच्याकडे तेवढे बघा बोलून तुषार काळे यांनी तक्रारदाराच्या भावाकडे लाचेची मागणी केली होती. ही मागणी करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. ही लाच तुषार काळे स्वतसह इतर कोणीही पोलीस अधिकार्यांसाठी मागितली होती का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. दरम्यान या कारवाईने खार पोलीस ठाण्यातील पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार पश्चिम उपनगरात राहत असून त्यांच्या भावाने एका प्रॉपटीसंदर्भात वांद्रे येथील लोकल कोर्टात खाजगी याचिका सादर केली होती. या याचिकेवर अलीकडेच सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी कोर्टाने खार पोलिसांना संबंधित तक्रारीची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले होते. कोर्टाकडून संबंधित कागदपत्रे प्राप्त होताच त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार काळे यांना सोपविण्यात आला होता. याच संदर्भात तक्रारदाराच्या भावाला चौकशीसाठ पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला होता. या जबानीदरम्यान तुषार काळे यांनी त्यांच्याकडे त्यांच्या बाजूने अहवाल सादर करतो असे सांगून आमच्याकडे तेवढे बघा असे सांगितले होते. त्यामुळे तक्रारदार त्यांच्या भावाच्या वतीने तुषार काळे यांना भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यात आले होते.
यावेळी त्यांनी त्यांच्या भावाच्या बाजूने अहवाल सादर करण्यासाठी त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी तुषार काळे यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. 19 जानेवारीला ही तक्रार प्राप्त होताच त्याची संबंधित पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. 13 मार्चला पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान तुषार काळे यांनी तक्रारदारांना त्यांच्या भावाच्या बाजूने अहवाल देण्यासाठी तीन लाखांची मागणी केली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याने त्यांच्यात दिड लाखांमध्ये तडजोड करण्यात आली.
तुषार काळे यांनी तीन लाखांची लाचेची मागणी करुन दिड लाखांची लाच घेण्याचे स्विकारण्याचे मान्य केले होते. ठरल्याप्रमाणे सोमवारी तक्रारदार दिड लाख रुपये घेऊन तुषार काळे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी लाचेची ही रक्कम घेताना तिथे आधीच सापळा लावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तुषार काळे यांना दिड लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर त्यांच्या राहत्या घरी पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र या कारवाईचा तपशील समजू शकला नाही. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण नावडकर, पोलीस निरीक्षक दिपीका डंगारणे व अन्य पोलीस पथकाने केली. तुषार काळे यांना लाचप्रकरणी अटक झाल्याचे वृत्त सशमींजताच खार पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.