वार्षिक जीएसटी फाईलचे काम करुन दिले म्हणून लाचेची मागणी
राज्यकर निरीक्षकावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मार्च 2026
मुंबई, – वार्षिक जीएसटी फाईलचे काम करुन दिले म्हणून एक लाखांची मागणी करुन पन्नास हजारावर तडजोडी करुन तीस हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केल्याप्रकरणी वांद्रे येथील बीकेसीच्या राज्यकर निरीक्षक अविनाश मैश्राम यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असून त्यांची जबानी नोंदविण्यात येणार आहे. लाचेची मागणी करणे अविनाश मैश्राम यांना चांगलेच महागात पडले आहे.
वांद्रे येथील बीकेसी परिसरात जीएसटी भवन असून तिथेच अविनाश मैश्राम हे राज्यकर निरीक्षक म्हणून कामाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची तक्रारदारांशी ओळख झाली होती. तक्रारदार हे एका खाजगी कंपनीत अकाऊंट मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांनी दरवर्षांप्रमाणे त्यांच्या कंपनीचे वार्षिक जीएसटी परतावा फाईल केली होती. या फाईलचे काम अविनाश मैश्राम यांनी पूर्ण करुन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे एक लाखांची मागणी केली होती.
त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 19 डिसेंबर 2025 रोजी अविनाश मैश्राम यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची त्याच दिवशी म्हणजे 19 डिसेंबरला पडताळणी करण्यात आली होती. यावेळी तक्रारदाराने एक लाख रुपये जास्त असल्याने त्यांना लाचेची रक्कम कमी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. अखेर तडजोडीनंतर त्यांच्यात तीस हजार रुपये देण्याचे फायनल झाले होते.
तीस हजाराची लाच घेण्याची अविनाश मैश्राम यांनी तयारी दर्शविली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी 7 भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. लाचप्रकरणी अविनाश मैश्राम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या सहकारी कर्मचारी आणि अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले.