मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 फेब्रुवारी 2025
मुंबई, – बंदर परवाना ट्रान्स्फरसाठी पंधरा हजाराची लाचेची मागणी केल्याप्रकरणी मस्त्यव्यवसाय विभागातील दोन सरकारी कर्मचारी आणि एक खाजगी व्यक्ती अशा तिघांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. पुलकेश वसंत कदम, निरज अशोक चासकर आणि संजय धनाजी कोळी अशी या तिघांची नावे आहेत. यातील पुलकेश हे मस्त्यव्यवसाय विभागात सहाय्यक आयुक्त तर सहाय्यक मस्त्यव्यवसाय विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे तर संजय कोळी हा खाजगी व्यक्ती असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या तिघांनाही शुक्रवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
यातील तक्रारदाराचा मासेमारीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे त्यांच्या मालकीची एक फायबर बोट आहे. मासेमारीसाठी त्यांच्याकडे मुंबई शहराचा बंदर परवाना आहे. त्यांना त्यांचा पूर्वीचा मुंबईचा परवाना रद्द करुन अलिबाग येथे ट्रान्स्फर करुन हवा होता. त्यासाठी त्यांनी वांद्रे येथील नवीन प्रशासकीय इमारत, मस्त्यव्यवसाय विभागातील सहाय्यक आयुक्त कार्यालयात अर्ज केला होता. 9 ऑक्टोंबर 2023 रोजी केलेल्या या अर्जाची साधी दखल घेण्यात आली नाही. संबंधित विभागाने सांगितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही त्यांना बंदर परवाना ट्रान्स्फर करुन मिळाला नवहता. 19 फेब्रुवारीला त्यांना संजय कोळी नावाच्या एका व्यक्तीने कॉल केला होता. त्याने पंधरा लाखांची मागणी करुन त्यांचा अर्ज मंजूर करुन देतो. पुलकेश कदम आणि निरज चासकर यांना लाचेची ही रक्कम दिल्याशिवाय त्यांचे काम होणार नाही असे सांगितले होते. संजय कोळी याने सहाय्यक आयुक्त पुलकेश कदम आणि सहाय्यक विकास अधिकारी विकास चासकर यांच्या वतीने लाचेची मागणी केली होती.
मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. यावेळी संजय कोळी यांनी तक्रारदाराच्या प्रलंबित कामासाठी पंधरा हजाराची लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पुलकेश कदम यांना पाच हजार तर निरज चासकर यांना दहा हजार देणार असल्याची कबुली दिली होती. ठरल्याप्रमाणे तक्रारदार गुरुवारी पंधरा हजाराची लाचेची रक्कम घेऊन मस्त्यव्यवसाय कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी पंधरापैकी पाच हजाराची लाचेची रक्कम पुलकेश कदम तर दहा हजाराची रक्कम निरज चासकर यांना दिली होती.
याच दरम्यान तिथे सापळा लावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागने दोन्ही अधिकार्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडले. याच गुन्ह्यांत नंतर संजय कोळी याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम 7, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अप्पर पोलीस उप-आयुक्त अनिल घेरडीकर, राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे, पोलीस निरीक्षक गणपत परचाके यांनी ही कारवाई केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी सांगितले.