पावणेदोन लाखांच्या लाचप्रकरणी मुख्य निरीक्षक अधिकार्‍याला अटक

गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 जुलै 2025
मुंबई, – अडीच लाखांच्या लाचेची मागणी करुन पावणेदोन लाख रुपयांची लाच घेताना चर्चगेट येथील नागरी पुरवठा मुख्यालयातील नियंत्रक शिधावाटप व संचालक विभागाचे मुख्य निरीक्षक अधिकारी विनायक वसंत निकम यांना मंगळवारी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मुंबईसह ठाण्यातील दोन गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी विनायक निकम यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्यांना बुधवारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान या कारवाईनंतर त्यांच्या राहत्या घरासह इतर ठिकाणी या अधिकार्‍यांनी कारवाई केल्याचे बोलले जाते.

यातील तक्रारदार कांदिवलीतील एका गॅस एजन्सीमध्ये मॅनेजर म्हणून कामाला आहे. तसेच त्यांच्या एका नातेवाईकांचा ठाण्यात स्वतची गॅस एजन्सी आहे. ऑक्टोंबर 2024 रोजी विनायक निकम यांनी त्यांच्या गॅस एजन्सीवर कारवाई केली होती. या कारवाईपूर्वी ऑगस्ट महिन्यांत त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या ठाण्यातील गॅस एजन्सीवर अशाच प्रकारे कारवाई केली होती. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. 16 जुलैला विनायक निकम यांनी तक्रारदार ांना कॉल करुन त्यांच्या कार्यालयात बोलाविले होते. दुसर्‍या दिवशी तक्रारदार विनायक निकम यांना भेटण्यासाठी त्यांच्या चर्चगेट येथील कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी महिन्यांला अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

मात्र लाचेची ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी ती रक्कम कमी करण्याची विनंती केली होती. यावेळी विनायक निकम यांनी साहेबांशी बोलून नंतर कळवतो असे सांगितले होते. 18 जुलैला विनायक कदम यांनी पुन्हा तक्रारदारांना कॉल करुन त्यांना भेटायला बोलावले होते. त्यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी त्याच्यासह त्यांच्या नातेवाईकाच्या गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी अनुक्रमे 1 लाख आणि 75 हजार असे पावणेदोन लाखांची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी विनायक निकम यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केली असता त्यांनी तक्रारदाराकडे अडीच लाखांची मागणी करुन तडजोडीनंतर पावणेदोन लाख रुपयांची लाच घेण्याची तयारी दर्शविली होती.

ठरल्याप्रमाणे मंगळवारी या अधिकार्‍यांनी त्यांच्या चर्चगेट येथील कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून पावणेदोन लाख रुपयांची लाचेची रक्कम घेताना विनायक निकम यांना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरुदध भष्ट्राचार प्रतिबंधक 7 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज सुतार, पोलीस निरीक्षक सुनिता दिघे व त्यांच्या पथकाने केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page