मनपाच्या कनिष्ठ पर्यवेक्षकाला आठ हजाराची लाच घेताना अटक
कामाच्या नियोजनासाठी लाचेची मागणी करणे महागात पडली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – कंबरदुखीमुळे एक मदतनीस तसेच फिक्स रोड देण्यासाठी पंधरा हजाराची लाचेची मागणी करुन आठ हजाराची लाचेची रक्कम घेताना सुरेश मारुती सुरकुले या कनिष्ठ पर्यवेक्षकाला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. सुरेश सुरकुले हा महानगरपालिकेच्या एल वॉर्ड, घनकचरा व्यवस्थापन विभाागत कनिष्ठ पर्यवेक्षक असून त्याच्या अटकने त्याच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कामाच्या नियोजनासाठी आपल्याच सहकारी कामगाराकडे लाचेची मागणी करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे.
यातील तक्रारदार महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रचंड कंबरदुखीचा त्रास होता. त्यावर त्यांचे नायर हॉस्पिटलमध्ये नियमित उपचार सुरु होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मंगळवारी 16 सप्टेंबरला तक्रारदार त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुरेश सुरकुले याला भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांची तक्रार त्यांच्याकडे मांडून त्यांना दुसरा कामगार मदतनीस म्हणून तसेच एकच फिक्स रोड देण्याबाबत विनंती केली होती.
या विनंतीनंतर सुरेश सुरकुलेने त्यांना महिन्याला सात हजार रुपये दे आणि घरी बसून नोकर कर किंवा एकदाच पंधरा हजार रुपये दे आणि फिक्स रोड घे असे सांगून लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्याशिवाय त्यांचे काम होणार नव्हते. त्यामुळे त्यांनी लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शवून सुरेश सुरकुले याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात सुरेश सुरकुले याने तक्रारदाराकडे पंधरा हजाराच्या लाचेची मागणी करुन आठ हजार घेण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी या अधिकार्यांनी त्याच्या कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून आठ हजाराची लाचेची रक्कम घेताना त्याला या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे, पोलीस निरीक्षक मोहन जगदाळे यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी सांगितले.