लाचप्रकरणी वकिलाला अटक तर पोलीस निरीक्षकाचे पलायन
गुन्ह्यांत अटक करण्यासाठी दहा लाखांची मागणी केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 सप्टेंबर 2025
मुंबई, – साडेचार लाखांचा दुसरा लाचेेचा हप्ता घेताना अरुणकुमार समरबहादूर सिंग या वकिलाला मुंबई युनिटच्या लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या कारवाईनंतर दादर रेल्वे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रोहित रमेश सावंत ह ेपळून गेले असून त्यांना या गुन्ह्यांत सहआरोपी करण्यात आले आहे. सध्या ते फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पोलीस असल्याची बतावणी करुन साडेदहा लाखांची कॅश लुटून नेल्याच्या एका प्रकरणातील आरोपीला अटक न करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे दहा लाखांची मागणी केली होती. त्यापैकी पाच लाख रुपये यापूर्वीच घेण्यात आले होते, लाचेचा दुसरा हप्ता घेताना ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे रेल्वे गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
विकास मुकेश गुप्ता हे कापड व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. गुजरात येथून कपडे खरेदी करुन त्या कपड्याची ते मुंबई शहरात होलसेलमध्ये विक्री करतात. 1 सप्टेंबरला ते गुजरात येथे कपडे खरेदीसाठी जात होते. वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे असताना दोन अज्ञात व्यक्तींनी पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांच्यासह त्यांच्या सामानाची तपासणी केली होती. त्यात त्यांच्या बॅगेत साडेदहा लाखांची कॅश सापडली नाही. ही कॅश घेऊन ते दोघेही पळून गेले होते. हा प्रकार लक्षात येताच विकास गुप्ता यांनी वांद्रे रेल्वे पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक केल्याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यांचा तपास नंतर दादर येथील गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. तपास अधिकारी म्हणून रोहित रमेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याच्या एका शिपायासह इतर आरोपींना अटक केली होती. याच गुन्ह्यांत तक्रारदाराच्या दाजीचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविण्यात आले होते. या गुन्ह्यांत त्यांना मदत करुन अटक न करण्यासाठी तपास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांनी अरुणकुमार सिंग या वकिलाच्या मार्फत दहा लाखांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदारांनी पाच लाखांचा पहिला हप्ता अरुणकुमार सिंगच्या मदतीने रोहित सावंत यांना दिला होता. मात्र वारंवार विचारणा करुनही ते उर्वरित पाच लाख रुपये देत नव्हते. त्यामुळे अरुणकुमार सिंग आणि रोहित सावंत हे सतत त्यांना कॉल करुन पैशांची मागणी करत होते. पैसे दिले नाहीतर त्यांच्यावर अटकेची कारवाईची धमकी देत होते.
तक्रारदारांना त्यांना लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे 18 सप्टेंबरला त्यांनी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अरुणकुमार सिंग आणि पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची दुसर्या दिवशी शहानिशा करण्यात आली होती. यावेळी रोहित सावंत यांनी अरुणकुमारशी बोलून घेण्यास सांगितले. अरुणकुमारला कॉल केल्यानंतर त्यांनी यापूर्वी पाच लाख रुपये घेतल्याचे मान्य करुन आणखीन पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यावेळी त्यांच्यात साडेचार लाख रुपये देण्याचे ठरले होते.
ठरल्याप्रमाणे सोमवारी तक्रारदार साडेचार लाख रुपये घेऊन अरुणकुमार सिंगला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याकडून लाचेचा दुसरा साडेचार लाखांचा हप्ता घेताना त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. चौकशीत त्याने ही लाच रोहित सावंत यांच्या वतीने घेतल्याचे मान्य केले होते. त्यानतर त्यांच्या अटकेसाठी पोलीस टिम रवाना झाले होते. मात्र सापळ्याची माहिती मिळताच रोहित सावंत हे घटनास्थळाहून पळून गेले आहे. त्यामुळे त्यांना या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
याप्रकरणी या दोघांविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याच्या 7, 7 (अ) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील, संतोष गुर्जर यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी सांगितले.