लुडो खेळण्याच्या वादातून मित्रांची हत्या करुन पलायन
पळून गेलेल्या आरोपीस दिड वर्षांनी आंधप्रदेशातून अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 डिसेंबर 2025
मुंब्रा, – लुडो खेळण्याच्या क्षुल्लक वादातून स्वतच्याच मित्राची हत्या करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस मुंब्रा पोलिसांनी दिड वर्षांनी आंधप्रदेशातून अटक केली. शमशुद्दीन शरफुद्दीन सैय्यद असे या 20 वर्षीय आरोपी मित्राचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या दिड वर्षांपासून शमशुद्दीन वेगवेळ्या ठिकाणी स्वतचे अस्तित्व लपवून राहत होता, विशेष म्हणजे तो मोबाईल वापरत नसल्याचा त्याचा शोध घेणे पोलिसांना कठीण झाले होते, तरीही पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन त्याला शिताफीने अटक केली.
14 जुलै 2024 रोजी मुंब्रा येथील ज्युबली पार्क, डॉ. आंबेडकर पाड्यातील खानका परिसरात एका तरुणाची त्याच्याच मित्राने हत्या केली होती. लुडो खेळण्यावरुन त्यांच्यात वाद झाला आणि या वादाचे पर्यावसान हाणामारीत व नंतर हत्येत झाला होता. या हत्येनंतर गुन्ह्यांतील मुख्य आरोपी शमशुद्दीन सैय्यद हा पळून गेला होता. त्याच्याविरुद्ध मुंब्रा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. मात्र गेल्या दिड वर्षांपासून शमशुद्दीन वेगवेगळ्या ठिकाणी स्वतचे अस्तित्व बदलत राहत होता. प्रत्येक वेळेस तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी होत होता. तरीही त्याचा पोलिसांनी शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना शमशुद्दीन हा हत्येनंतर आंधप्रदेशात पळून गेला असून सध्या तो तिथेच वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस शिपाई नितीन पाटोळे यांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, शरद कुंभार, राजू पाचोरकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत, पोलीस हवालदार थोरात, खाबडे, शिंदे, तडवी, पोलीस शिपाई आव्हाड, नितीन पाटोळे, महाडिक, घुले, विरकर, महिला पोलीस शिपाई देसाई आदीचे एक विशेष पथक आंधप्रदेशात पाठविण्यात आले होते.
आरोपी मोबाईल वापरत नसल्याने त्याचा निश्चित ठावठिकाणा सापडत नव्हता. तरही सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत, पोलीस शिपाई नितीन पाटोळे यांनी कौशल्यपूर्ण तपास करुन शमशुद्दीनला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तोच हत्येच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर ट्रॉन्झिंट रिमांडवर मुंब्रा येथे पुढील चौकशीसाठी आणण्यात आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मित्रांची हत्या केल्यानंतर शमशुद्दीन हा मुंब्रा येथून पळून गेला होता, अखेर दिड वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.