पंकजा मुंडेच्या पीएच्या डॉक्टर पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

पतीसह नंणद-दिराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 नोव्हेंबर 2025
मुंबई, – पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे मानसिक तणावातून गौरी अनंत गर्जे या डॉक्टर महिलेने तिच्या वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी गौरीचा पती अनंत भगवान गर्जे, नणंद शितल भगवान गर्जे आणि दिर अजय भगवान गर्जे या तिघांविरुद्ध वरळी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा संशय तिच्या पालकांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्याने या तिघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर दोषीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

अशोक मारुती पालवे हे बीडच्या कालिकानगर, शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची पत्नी अनकनंदा ही नर्स म्हणून काम करते मुलगी गौरी हिचे बीडच्या आदित्य डेन्टल कॉलेजमधून बीडीएसचे शिक्षण पूर्ण झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती सेंट जॉर्ज रुग्णालयात डेन्टल असिस्टंट म्हणून काम करत होती. त्यानंतर तिची सायन रुग्णालयात बदलद झाली होती. 7 फेब्रुवारी 2025 रोजी गौरीचे अनंत गर्जे याच्यासोबत दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने बीडच्या नगर रोड विजय लॉन्समध्ये विवाह झाला होता. अनंत हा अहिल्यानगर, पाथर्डी, मोहोज देवडेचा रहिवाशी असून सध्या तो राज्याचे मंत्री व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे खाजगी स्वीय सहाय्यक म्हणून काम करतो.

गौरी आणि अनंत ते दोघेही मुंबईत काम करत असल्याने लग्नानंतर गौरी ही अनंतसोबत वरळीतील जी. एम. भोसले रोडवर, नवीन बीडीडी वसाहत, डी विंगच्या तिसाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 3006 मध्ये राहण्यासाठी गेली होती. त्यांच्यासोबत तिचा दिर अजय हादेखील राहत होता. लग्नानंतर काही दिवसानंतर गौरीचे अनंतसोबत क्षुल्लक कौटुंबिक वादातून खटके उडत होते. हा प्रकार तिने तिच्या आईला सांगितला होता, मात्र तिने तिची समजूत काढून तिला वाद न घालण्याचा सल्ला दिला होता. 30 सप्टेंबरला तिने तिच्या आईला व्हॉटअपवर काही फोटो पाठविले होते. त्यात एका महिलेचे संमतीपत्र आणि जाहीरनामा होता. त्यात या महिलेचा पती म्हणून अनंत गर्जे याचा उल्लेख होता. या कागदपत्रावरुन या महिलेचे अनंतसोबत काहीतरी संबंध असल्याचा तिला संशय आला होता. ते कागदपत्रे तिला घर शिफ्ट करताना सापडले होते.

या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. ती सतत मानसिक तणावात होती. त्यामुळे तिच्या आईने तिला काही दिवस बीड येथे येण्याचा सल्ला दिला होता. काही दिवसांनी तिने संबंधित महिलेविषयी अनंतला विचारणा केली होती. मात्र त्याने तिच्याशी स्पष्टपणे काहीही बोलण्यास नकार दिला होता. तिला काय करायचे आहे ते कर, मी कोणाला घाबरत नाही. याबाबत तुझ्या कुटुंबियांना काहीही सांगितले तर तुझे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करेन अशी धम्कीच त्याने तिला दिली होती. अनंतचे त्या महिलेशी अफेसर होते, याबाबत तिची बहिण शितल आणि भाऊ अजय यांना माहित होते. शितलकडे विचारणा केल्यानंतर तिने तिला अनंतसोबत जमत नसेल तर मी माझ्या भावाचे दुसरे लग्न लावून देते अशी धमकी दिली होती.

3 ऑक्टोंबरला अनंतचा वाढदिवस होते. त्यामुळे अशोक पालवे हे त्यांची पत्नी अलकनंदासोबत मुंंबईत येण्यासाठी निघाले होते. मात्र गौरीने त्यांना मुंबईत येण्यास नकार दिला होता. ती सतत रडत होती. तिची मानसिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे ते तिला न सांगता वरळीतील तिच्या राहत्या घरी आले होते. यावेळी तिने त्यांना तुम्ही का आलात, त्यांना तुम्ही आलेले आवडणार नाही. त्यांच्या अफेसरबाबत त्यांच्याशी काहीही चर्चा करु नका असे सांगितले. त्यामुळे त्यांनी याबाबत अनंतशी चर्चा केली नव्हती. याच दरम्यान त्यांना गौरीच्या चेहर्‍यावर आणि गळ्यावर मारहाण केल्याच्या व्रण दिसत होते. याबाबत तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने त्यांना काहीही सांगितले नाही. त्यामुळे 3 ऑक्टोंबरला अनंतचा वाढदिवस साजरा करुन ते दोघेही बीडला निघून गेले होते.

शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता अनंतने अशोक पालवे यांना दोन मिसकॉल आले होते, मात्र ते कामात असल्याने त्याचे कॉल घेतले नाही. त्यानंतर त्यांनी त्याला कॉल केला असता त्याने कॉल घेतले नाही. शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता अनंतने त्यांना कॉल करुन गौरी आत्महत्येचा प्रयत्न करत असून तिला समजविण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी तिला फोन देण्यास सांगितले, मात्र काही वेळानंतर अनंतने तो गौरीला रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांचे नातेवाईक कारभारी खेडकर यांना तिथे जाऊन नक्की काय झाले आहे याबाबत माहिती घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे ते रात्री तिथे गेले होते. यावेळी त्यांना गौरीने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यता आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

ही माहिती ऐकल्यानंतर पालवे कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे ते रात्रीच मुंबईत येण्यासाठी निघाले होते. या घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अशोक पालवे यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत त्यांनी गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप केला. अनंतचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधावरुन गौरी आणि अनंत यांच्यात वैवाहिक जीवनात कटुता आली होती. पतीच्या अफेसरमुळे गौरी ही मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या करुन जीवन संपविल्याचा आरोप केला होता. गौरीच्या आत्महत्येला तिचा पती अनंत, बहिण शीतल आणि भाऊ अजय हे तिघेही जबाबदार असल्याचे सांगून त्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृतत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले. गौरी आणि अनंत यांचे फेब्रुवारी महिन्यांत लग्न झाले होते. लग्नाला जेमतेम दहा महिने झाले असताना गौरीच्या आत्महत्येने पालवे कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page