मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 फेब्रुवारी 2026
मुंबई, – गोवंडी येथे राहणार्या शिफा तुफेल अहमद शेख या 19 वर्षांच्या तरुणीची गोळी झाडून हत्या करुन पळून गेलेल्या चारही आरोपींना अवघ्या बारा तासांत अटक करुन या हत्येचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अटक आरोपींमध्ये शूटर महिलेसह तिच्या प्रियकर, भाऊ आणि मित्राचा समावेश आहे. साजिद शेरमोहम्मद शेख, कलाम अब्दुल सलाम चौधरी, रिझवान समशुद्दीन शेख ऊर्फ नदीम आणि तबस्समूम शेरमोहम्मद शेख अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर चारही आरोपींना लोकल कोर्टाने 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्रिकोणी प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
तुफैल अहमद नबी हुसैन शेख हे बांधकाम कॉन्ट्रक्टर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोवंडीतील बैंगनवाडी, कमलारमण नगर, फुरकानिया मशिदीजवळ राहतात. शिफा ही त्यांची मुलगी असून तिचे नदीमशी मैत्री होती. नदीम हा याच परिसरात राहत असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याचे त्याच परिसरात राहणार्या तब्बसूमशी मागील पाच ते सात वर्षांपासून प्रेमसंंबंध होते. नदीमचे शिफासोबत असलेल्या मैत्रीला तिचा विरोध होता. याच कारणावरुन तिने शिफाला नदीमचा नाद सोडण्यास सांगून तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर तुफैल शेख यांनी शिफाला त्यांच्या गावी पाठविले होते.
12 जानेवारीला शिफा ही उत्तरप्रदेशातून मुंबईत परत आली होती. मंगळवारी 10 फेब्रुवारी सकाळी साडेदहा वाजता ती नास्ता आणण्यासाठी बाहेर गेली होती. याच दम्यान तिची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. रक्तबंबाळ झालेल्या शिफाला तातडीने गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यता आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. ही माहिती प्राप्त होताच पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांच्यासह शिवाजीनगर आणि गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी तुफैल शेख यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. या खुलाशानंतर पोलीस उपायुक्त समीर शेख यांच्या आदेशावरुन शिवाजीनगर पोलिसांच्या तीन ते चार वेगवेगळ्या पथकाने पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांच्या पथकातील पोलीस रिीक्षक पाटील, पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवले, जाधव, खेबुडे, पोलीस उपनिरीक्षक हातीम, महिला पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, मालवेकर, बाबर, गोल्हार व अन्य पोलीस पथकाने वेगवेगळ्या परिसरातून साजिद शेख, कलाम चौधरी, रिझवान शेख आणि तबस्सूम शेख या चौघांना अटक केली.
त्यांच्या चौकशीतून त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. अटकेनंतर चारही आरोपींना पोलीस बंदोबस्तात बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिफाच्या हत्येच्या गुन्ह्यांत अवघ्या बारा तासांत पोलिसांनी पर्दाफाश करुन चारही आरोपींना अटक केली होती. त्यामुळे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे व त्यांच्या पथकाचे कौतुक केले होते.