टाटा गार्डनमधील हत्येचा 24 तासांत पर्दाफाश करण्यात यश
आर्थिक वादातून कर्मचार्याची हत्या करणारा मुकादम गजाआड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2026
मुंबई, – चर्चगेट येथील वीर नरिमन रोड, टाटा गार्डनमध्ये राहुल पंजवानी ऊर्फ पंजाबी या 55 वर्षांच्या व्यक्तीच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात आझाद मैदान पोलिसांना यश आले आहे. हत्येचा गुन्हा दाखल होताच कुठलाही पुरावा नसताना आनंद पांडुरंग जाधव या मुकादमला पोलिसांनी अटक केली. मृत राहुल हा आनंदकडे कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात पैशांवरुन वाद सुरु होता. याच आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर आरोपीला किल्ला कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शनिवारी सायंकाळी पाच वाजता मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून चर्चगेट येथील वीर नरिमन रोड, बसडेपोजवळील टाटा गार्डनमध्ये एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर आझाद मैदान पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले होते. तिथे पोलिसांना एका 50 ते 55 वयोगटातील व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आला. त्याला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीचे नाव राहुल पंजवानी ऊर्फ पंजाबी असल्याचे उघडकीस आले. त्याची अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून हत्या केली होती. त्याची हत्या करुन मारेकरी पळून गेला होता. राहुलची हत्या झाल्याचे उघडकीस येताच पोलीस उपनिरीक्षक जनार्दन रामचंद्र जाधव यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
या हत्येची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आझाद मैदान पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे, पोलीस निरीक्षक नारायण पडवळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद शाह, लिलाधर पाटील, रोहित कलुबर्मे, महिला पोलीस उपनिरीक्षक आश्विनी टेमस्कर, पोलीस हवालदार राजेंद्र कटरे, सचिन पाटील यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. यातील एका फुटेज पोलिसांना आनंद जाधव दिसला होता. त्यामुळे या पथकाने फोर्ट परिसरातून आनंदला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
तपासात आनंद हा फोर्ट येथील पी डिमेलो रोडवर राहत असून मुकादम म्हणून काम करतो. त्याच्याकडे काही कंत्राटी कामगार असून त्यात मृत राहुल पंजाबी याचा समावेश होता. या कंत्राटी कामगारांना दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी त्यांच्या कामाची मजुरी दिली जात होती. मात्र काही दिवसांपासून आनंद हा त्याच्या कामगारांना कामाचे पैसे देत नव्हता. याच कारणावरुन राहुल आणि आनंद यांच्यात वाद सुरु होता. शनिवारी राहुलने आनंदकडे पैसे असल्याचे पाहिले होते, त्यामुळे त्याने त्याच्या कामाच्या पैशांच्या मागणी केली होती. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून रागाच्या भरात आनंदने राहुलची दगडाने ठेचून हत्या केली होती.
या हत्येनंतर तो तेथून पळून गेला होता. मात्र सीसीटिव्ही फुटेजमध्ये तो घटनास्थळी उपस्थित असल्याचे पुरावे सापडताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने आर्थिक वादातून त्यानेच राहुलची हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यांतील दगड, आरोपीचे कपडे, मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.