हत्येच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस दहा वर्षांनी अटक

आर्थिक वादातून चायनीस विक्रेत्याची हत्या केली होती

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मार्च 2025
मुंबई, – हत्येच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. इम्रान साबीर शेख ऊर्फ मोहम्मद राहिल मोहम्मद साबीर शेख असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी नागपाडा पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी साजिद आदिकअली चौधरी आणि वसिम अक्रम मोहम्मद शकील शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. आर्थिक वादातून या तिघांनी चायनीस विक्रेता रियाजउद्दीन ऊर्फ रियाज हुसैन अब्दुल कुरेशी याची हत्या केल्याचा आरोप आहे.

रियाजउद्दीन हा नागपाडा येथील मोरलँड रोड, मामसा इस्टेट, नया नगरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहत असून आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या मालकीचे एक चायनीसची गाडी होती. या व्यवसायासाठी त्याने साजिद चौधरीकडून वीस लाख रुपये घेतले होते. ही रक्कम त्याला लवकरात लवकर देण्याचे त्याने आश्वासन दिले होते. मात्र रक्कम मोठी असल्याने एकाच वेळेस ती रक्कम देणे त्याला शक्य झाले नाही. त्यामुळे रियाजउद्दीन व साजिद यांच्यात काही दिवसांपासून प्रचंड वाद सुरु होता. याच वादातून साजिदने वसिमच्या मदतीने त्याच्या हत्येची योजना बनविली होती. त्यासाठी त्याने वसिमला वीस हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. हत्येच्या दोन दिवसांपूर्वी रात्री साजिदने रियाजउद्दीनला मुंबई सेंट्रल येथील ड्रिम बिल्डींग कंपाऊंडजवळील रेल्वे अधिकारी विश्रामगृहाजवळ बोलाविले होते. तिथे वसिम आधीच आला होता. यावेळी पैशांवरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून वसिमने रियाजउद्दीनची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली.

याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरु केला होता. तपासात या हत्येची सुपारी साजिद चौधरीने दिल्याचे तसेच वसिम शेख आणि इम्रान शेख यांनी रियाजउद्दीनची हत्या केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर साजिद चौधरी आणि वसीम शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. हत्येनंतर इम्रानशेख हा पळून गेला होता. गेल्या दहा वर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता, मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. तरीही पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना इम्रान हा मोहम्मद राहिल शेख नाव बदलून गुजरात येथे राहत असल्याची खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती.

या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुकत् किशोरकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास कदम, पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ, पोलीस हवालदार सांगोळे, कांबळे यांनी गुजरात येथून मोहम्मद राहिल ऊर्फ इम्रान शेख याला ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला नागपाडा पोलिसांकडे सोपविण्यात आले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page