हत्येच्या गुन्ह्यांतील आरोपीस तेरा वर्षांनी बिहारहून अटक

हत्येनंतर दिल्ली, बिहार, नेपाळमध्ये वास्तव्यास होता

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जुलै 2025
मिरा-भाईंदर-वसई-विरार, – राहण्यासह जेवणावरुन होणार्‍या वादातून विनोद प्रभू गुप्ता या 21 वर्षांच्या तरुणाची हत्या करुन पळून गेलेल्या आरोपीस तेरा वर्षांनी बिहार येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. बंगाली ऊर्फ महानंद सुरजीकांत मिस्त्री असे या 39 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी नवघर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हत्येनंतर बंगाली हा मुंबईहून दिल्ली, बिहार आणि नंतर नेपाळला पळून गेला होता. नेपाळहून बिहारला आल्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. हत्येच्या या गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विनोद गुप्ता हा तरुण मूळचा उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगरचा रहिवाशी होता. काही वर्षांपूर्वी तो उत्तरप्रदेशातून मुंबई शहरात नोकरीसाठी आला होता. तेव्हापासून तो भाईंदर परिसरात राहत होता. 6 ऑगस्ट 2012 रोजी विनोदची त्याच्याच परिचित बंगाली ऊर्फ महानंद याने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. गाळ्यामध्ये राहण्यासह जेवणावरुन त्यांच्यात सतत खटके उडत होते. त्यातून रागाच्या भरात त्याने विनोदची हत्या करुन घटनास्थळाहून पलायन केले होते. हा प्रकार दुसर्‍या दिवशी उघडकीस येताच नवघर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासादरम्यान या हत्येत बंगालीचा सहभाग उघडकीस आला होता. मात्र हत्येनंतर तो पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात होता.

गेल्या तेरा वर्षांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असताना बंगाली हा बिहार राज्यात वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक एकच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डेाईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, सचिन हुले, सुधीर खोत, अश्विन पाटील, सनी सूर्यवंशी, पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, गौरव बारी, सौरभ इंगळे, धिरज मेंगाणे, मसुब किरण आसवले, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण आदीचे एक विशेष पथक बिहारला पाठविण्यात आले होते.

या पथकाने तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे बंगाली ऊर्फ महानंद याला बिहारच्या पश्चिम पंचारण, पडरोन, कामता कॉलनी परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच तेरा वर्षांपूर्वी विनोद गुप्ता या तरुणाची हत्या केल्याची कबुली दिली. या हत्येनंतर तो मुंबईतून दिल्ली, पटना आणि नेपाळला पळून गेला होता. प्रत्येक ठिकाणी तो स्वतचे अस्तित्व लपवून राहत होता. गेल्या तेरा वर्षांपासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता, अखेर त्याला बिहारहून अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी भाईंदर येथे आणण्यात आले होते. त्याचा ताबा नवघर पोलिसांना देण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page