हत्येच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस दिड वर्षांनी अटक
तरुणाच्या हत्येनंतर पुरावा नष्ट करुन पलायन केले होते
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 सप्टेंबर 2025
मिरारोड, – हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस काशिमिरा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अंबरनाथ येथून अटक केली. रामू ऊर्फ रामकेश दूधनाथ यादव असे या 27 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहेत. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावर रितेश राजेंद्र कावळे या 25 वर्षांच्या तरुणाची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो गेल्या दिड वर्षांपासून वॉण्टेड होता, अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रितेश कावळे हा भाईंदर येथील राईगाव, शिवनेरीच्या गल्ली क्रामंक 18 मध्ये राहत होता. 5 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता त्याची भाईंदरच्या भाजीमार्केटजवळील साधूराम हॉटेलमध्ये अज्ञात व्यक्तीने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. त्यात त्याच्या छातीला, गळ्याला, खांद्याला, पायाला आणि कपाळावर गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी नियाज अहमद चौधरी यांच्या तक्रारीवरुन नवघर पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट करणे तसेच इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.
तपासात रितेशला नग्न करुन आरोपींनी हातपाय बांधून बेदम मारहाण लाथ्याबुक्यांनी मारहाण केली होती. नंतर त्याची टॉम बार, दांडके आणि तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यांचा नवघर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून संमातर तपास सुरु केला होता. तपासात रामू यादव याचा सहभाग उघडकीस आला होता, मात्र हत्येनंतर तो पळून गेला होता. तो वेशभूषा बदलून कोणत्याही संपर्क साधनाच वापर न करता अंबरनाथ परिसरात वास्तव्यास होता. ही माहिती प्राप्त होताच या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस आयुक्त निकेश कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, काशिमिरा गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, सचिन हुले, प्रशांत विसपुते, स्वप्नील मोहिले, पोलीस शिपाई गौरव बारी, मसुब किरण आसवले, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी खोनीगाव, पाईपलाईन रोड पसिरातून रामू यादवला ताब्यात घेतले होते. तिथे तो हमालीचे काम करत होता. स्वतची ओळख पटू नये म्हणून त्याने डोक्यावरील केस, दाढी आणि मिशी काढली होती.
चौकशीत हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेला तोच रामू यादव असल्याचे उघडकीस आले. रामू हा मूळचा उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगर, बांसीचा रहिवाशी आहे. सध्यातो अंबरनाथ येथील खोनीगाव, उबार्लीच्या त्याच्याच वॉशिंग जिन्स फॅक्टरीमध्ये वास्तव्यास होता. हत्येनंतर तो उत्तरप्रदेशासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास होता. काही दिवसांपासून तो अंबरनाथ येथे लपला होता. मात्र हत्येच्या दिड वर्षांनंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.