सहकारी कर्मचार्याच्या हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपीस अटक
मुंबईहून पळून गेल्यानंतर 48 तासांत बिहारहून ताब्यात घेतले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 नोव्हेंबर 2025
मुंबई, – गिरगाव येथे क्षुल्लक वादातून रमेश हजाजी चौधरी या 39 वर्षांच्या सहकारी कर्मचार्याची हत्या करुन पळून गेलेल्या आरोपीस बिहारहून परिमंडळ दोनच्या विशेष पथकाने अटक केली. सुरज संजय मंडल असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना रविवारी 16 नोव्हेंबरला मध्यरात्री एक ते दिडच्या सुमारास गिरगाव येथील खेतवाडी सातवी गल्ली, इमारत क्रमांक तेरामध्ये घडली. याच ठिकाणी सेंटेक कोटेड स्टिल प्रायव्हेट लिमिटेड नावाचे एक शॉप आहे. याच शॉपमध्ये रमेश चौधरी आणि सुरज मंडल हे दोघेही कामाला होते. दिवसभर काम करुन ते शॉपच्या पहिल्या मजल्यावर झोपत होते. रविवारी रात्री उशिरा या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात सुरजने रमेशला लाकडी स्टूलसह अग्निशमन उपकरणाने बेदम मारहाण करुन नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली होती.
ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच व्ही. पी रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या रमेशला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या हत्येमागे सुरज मंडलचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर तो घटनास्थळाहून पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. प्राथमिक तपासात रमेश चौधरी हा गुजरातच्या बनासकाटा, धनोराच्या भातरामचा तर सुरज मंडल हा बिहारचा रहिवाशी होता.
हत्येनंतर तो बिहारला पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा शोध सुरु केला होता. यातील एका फुटेजमध्ये सुरज हा कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बिहारला गेल्याचे दिसून आले होते. त्यानंतर पोलीस पथक तिथे रवाना झाले होते. या पथकाने मधुबनी येथील गावी त्याचा शोध घेतला, मात्र तो तिथे नव्हता. त्यानंतर त्याच्या मोबाईल लोकेवरुन तो पटना येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
या माहितीनंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुरजला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच रमेश चौधरीची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपीस 48 तासांत बिहारहून अटक केल्याने संबंधित पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहीतकुमार गर्ग, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गुरव, विनित कदम, गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड, विकास राऊत, पोलीस उपनिरीक्षक श्यामराव वाटसर, एटीएसी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ढोरकुले, सहाय्यक फौजदार सकपाळ, पोलीस हवालदार मोपारी, तोडणकर, पोलीस शिपाई नागरे, व्यवहारे, गांगड, आंबिलवाड, कांडेकर, एल. टी मार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिकेत शेडगे, पायधुनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख, पोलीस उपनिरीक्षक वायळ, डी. बी मार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, तांत्रिक मदत पोलीस शिपाई गणेश जगदेव यांनी केली.