मनोरुग्ण मातेकडून अकरा वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या
स्वतच्या हाताच्या नसा ब्लेडने कापून आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – मानसिक रुग्ण असलेल्या एका महिलेने स्वतच्या अकरा वर्षांच्या मुलीची ओढणीने गळा आवळून हत्या करुन ब्लेडने स्वतच्या हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. हत्या झालेल्या मुलीचे नाव रुहानी राज सोलंकी तर जखमी मनोरुग्ण महिलेचे नाव रेखा राज सोलंकी आहे. तिच्यावर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी रेखाविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून या गुन्ह्यांत तिच्यावर अद्याप अटकेची कारवाई झाली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश हिरेमठ यांनी सांगितले. प्राथमिक तपासात रेखाला अधूनमधून वेड्याचे झटके येत असून त्यातूनच हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान गुरुवारी घडलेल्या या हत्या आणि आत्महत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना गुरुवारी १५ फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता बोरिवलीतील नॅशनल पार्कजवळील कुलूपवाडी, गोरांक्ष धाम सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीमध्ये राजू पुंजाजी सोलंकी हा त्याची पत्नी रेखा आणि अकरा वर्षांची मुलगी रुहानीसोबत राहतो. याच परिसरात त्याचे एक सलूनचे दुकान आहे. त्याची पत्नी रेखा ही मानसिक रुग्ण असून तिला अधूनमधून वेड्याचे झटके येतात. त्यातून ती प्रचंड आक्रमक होते. तिच्यावर उपचार सुरु असून या उपचारातून तिला काही फरक जाणवत नव्हता. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता रेखाने तिच्याच अकरा वर्षांची मुलगी रुहानी हिची ओढणीने गळा आवळून हत्या केली. या हत्येनंतर तिने ब्लेडने स्वतच्या हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.
रात्री उशिरा राज घरी आला असता त्याला हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्याने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने या दोघांनाही तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे रुहानीला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. रेखाची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. सकाळी तिच्या प्रकृतीत प्रचंड सुधारणा झाली होती. तिच्या जिवावरील धोका टळल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश नंदीमठ यांच्यासह अन्य पोलीस पथकाने तिथे धाव घेतली होती. याप्रकरणी राज सोलंकी याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्याच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी रेखाविरुद्ध पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. रेखावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्यामुळे तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.