मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – क्षुल्लक वादातून रागाच्या भरात एका तरुणाने त्याच्याच मित्राच्या गळ्यावर कैचीने वार करुन हत्या करुन स्वत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. हत्या झालेल्या मित्राचे नाव मोहम्मद अय्याज नायब अहमद शेख असून आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव सद्दाम हुसैन मोहम्मद रफिक शेख असे आहे. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी सद्दामविरुद्ध हत्येसह आत्महत्येच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांसह व्यापार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासात क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले असून त्यांच्यात नक्की कुठल्या कारणावरुन वाद झाला होता याचा खुलासा मात्र होऊ शकला नाही.
गुलाम सरोवर चौधरी हे कापड व्यापारी असून त्यांचा साकिनाका येथील घास कंपाऊंडमध्ये कपड्याचा कारखाना आहे. याच कारखान्यात मोहम्मद अय्याज आणि सद्दाम हे दोघेही कामाला होते. ते दोघेही मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असल्याने काही दिवसांत त्यांची चांगली मैत्री झाली होती. दिवसभर कारखान्यात काम केल्यानंतर ते रात्रीच्या वेळेस तिथेच झोपत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यात कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. हा वाद नंतर विकोपास गेला होता. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते.
मंगळवारी काम संपल्यानंतर ते दोघेही झोपण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. त्यातून रागाच्या भरात सद्दामने मोहम्मद अय्याजवर कैचीने गळ्यावर वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. या घटनेनंतर तो प्रचंड घाबरला. आता त्याला पोलीस अटक करतील या भीतीने सद्दामने कारखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सकाळी गुलाम चौधरी हे कारखान्यात आले होते. मात्र कारखान्याला आतून कडी होती. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कोणीच दरवाजा उघडला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता मोहम्मद अय्याज हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर सद्दामने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या घटनेनंतर त्यांनी साकिनाका पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. कारखान्याचा दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला आणि दोघांनाही राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे सद्दाम आणि मोहम्मद अय्याज या दोघांनाही डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी कारखान्याच्या मालकाची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. या जबानीतून या दोघांमध्ये वाद सुरु असल्याचे उघडकीस आले. त्यातूनच हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून त्यांच्या हत्येसह आत्महत्येची माहिती त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांना देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.