मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 सप्टेंबर 2025
मुंबई, – व्यावसायिक गाळा खरेदी-विक्री व्यवहाराच्या वादातून एका व्यक्तीची हत्या करुन पळून गेलेल्या वॉण्टेड आरोपीस कांदिवली पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली. रितिक रविंद्र चौहाण असे या 20 वर्षीय आरोपीचे नाव असून हत्येनंतर तो त्याच्या गावी पळून गेला होता. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिपक रामलखन यादव हे कांदिवलीतील लालजीपाडा परिसरात राहतात. वांद्रे येथील बीकेसी, डायमंड मार्केटमध्ये ते कामाला आहे. त्यांच्या वडिलांचे तीन भाऊ असून त्यापैकी एका भावाचे 2010 रोजी निधन झाले आहे. त्यांचा मालकीचा एक गाळा होता. हा गाळा त्यांच्या भावाने संजय चौहाण याला विक्री केला होता. त्यामुळे त्याने गाळ्याचा ताबा घेतला होता. हा व्यवहार त्यांना माहित नसल्याने त्यांच्यात गाळ्यावरुन वाद सुरु होता. त्यामुळे त्यांनी दिडोंशीतील सिटी सिव्हील कोर्टात एक याचिका सादर केली होती. या याचिकेवर निकाल देताना कोर्टाने संजय चौहाण याचा गाळ्यावरील मालकी हक्काचा दावा फेटाळून लावलाह होता. त्यामुळे दिपक यादवयांनी त्यांच्या गाळ्याचा ताबा घेतला होता.
4 सप्टेंबरला संजय चौहाण हा त्याच्या इतर वीसहून सहकार्यांसोबत त्यांच्या घरात घुसला आणि त्यांनी गाळ्याच्या वादातून त्यांच्यासह त्यारंच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला केला होता. लाकडी काठ्या, लाकडी बांबू आणि काठ्याने केलेल्या मारहाणीत त्यांच्यासह इतर लोक जखमी झाले होते. त्यांच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. तिथेच त्यांचे वडिल रामलखन यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी हत्या, हत्येचा प्रयत्नासह अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच संजय राजदेव चौहाण, कमलेश राजदेव चौहाण, अवधेश बुधनाथ चौहाण, अमरनाथ राजदेव चव्हाण ऊर्फ तूफानी या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर इतर आरोपींची नावे समोर आली होती. त्यात रितिक चौहाण याचा समावेश होता. सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलीस पथक गुजरातच्या राजकोट, छत्तीसगढ येथे गेले होते. मात्र पोलीस पोहचण्यापूर्वीच तो तेथून पळून गेला होता. छत्तीसगढ येथून तो उत्तरप्रदेशातील गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण सोनकवडे, पोलीस निरीक्षक शेखर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वानखेडे, सहाय्यक फौजदार अशोक गोटमुगले, पोलीस शिपाई स्वप्निल जोगलपुरे, योगेश हिरेमठ, सुधीर नादकर, विशाल तिजारे, परमेश्वर चव्हाण, महेश माळी, राणे आदीचे एक पथक उत्तरप्रदेशला गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने वॉण्टेड असलेल्या रितीकला देवरिया सदर या त्याच्या गावातून शिताफीने ताब्यात घेतले. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.