पाईपवरुन चढून फ्लॅटमध्ये प्रवेश करुन ३३ लाखांची घरफोडी
नागपाड्यातील घटना; सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ जून २०२४
मुंबई, – इमारतीच्या पाईपवरुन नवव्या मजल्यापर्यंत चढून वॉशरुमच्या काचा काढून फ्लॅटमध्ये प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने सुमारे ३३ लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार नागपाडा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या आरोपीचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु केला आहे. शनिवारी रात्री उशिरा घरफोडीचा हा प्रकार उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना २९ मे रात्री दहा ते ३० मे रात्री सव्वाबाराच्या सुमारास नागपाडा येथील अरब गल्ली, अहमदतुल्ला अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ९०१ मध्ये अनिस मोहम्मद सादिक कुरेशी हे त्यांच्या पत्नी आणि तीन मुलांसोबत राहतात. त्यांचा साकिनाका येथे वेस्ट पेपरचा व्यवसाय असून या कामात त्यांना त्यांचे तिन्ही मुले मदत करतात. उत्तरप्रदेशात नातेवाईकांचे लग्न असल्याने ते त्यांच्या पत्नीसोबत ४ मेला गावी गेले होते. यावेळी त्यांचे दोन्ही मुले घरात होते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी मुलाचे काही मित्र आले होते, काही वेळानंतर ते सर्वजण जेवणासाठी बाहेर गेले होते. रात्री उशिरा सव्वाबारा वाजता घरी आल्यानंतर त्यांच्या मुलाला घराचे लॉक अनलॉक होते. कोणीतरी आतून दरवाजा बंद केला होतो. त्यामुळे त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरातील सर्व लाईट सुरु होत्या. वॉशरुमच्या खिडकीच्या काचा काढून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील ३३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळविला होता. त्यात साडेपाच लाखांची कॅश, साडेचार लाखांचे चांदीच्या नाणी, पायातील लछ्छे आणि विविध सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता.
घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्याने ही माहिती त्याच्या वडिलांसह नागपाडा पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद सादिक यांची जबानी नोंदविण्यात आली असून त्यांच्या जबानीतून घरातून ३३ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या फुटेजवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या चोरट्याचा शोध सुरु केला आहे. प्राथमिक तपासात आरोपीने पाईपवरुन चढून वॉशरुमच्या खिडकीच्या काचा काढून फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने कपाटातील हा मुद्देमाल चोरी करुन त्याने आतून फ्लॅटची कडी लावून पुन्हा पाईपवरुन खाली उतरुन पलायन केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.